

महेश भागिवंत
नवलाख उंबरे: सक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाज सध्या सुगडी (खण) निर्मितीत पूर्णतः व्यस्त झाला आहे. गावागावांमध्ये कुंभाराच्या चाकावर फिरणारी माती आणि त्यातून साकार होत असलेली सुगडी पाहिल्यावर परंपरा आजही जिवंत असल्याची जाणीव होते. संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू, तिळगूळ वाटप आणि धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या या सुगड्यांना विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे.
मातीच्या सुगड्यांना आजही महत्त्व
अनेक कुटुंबांमध्ये लहान मुले आणि महिलासुद्धा या कामात सहभागी होत आहेत. कुणी माती तयार करण्यात मदत करतो, कुणी बोळकी वाळवण्याची जबाबदारी घेतो. तर, कुणी भट्टीवर लक्ष ठेवतो. ही सामूहिक मेहनत कुंभार समाजाची एकजूट आणि परंपरेवरील निष्ठा दर्शवते.
बदलत्या काळात आधुनिक साहित्य आणि पर्याय उपलब्ध असतानाही संक्रांतीसाठी मातीच्या सुगड्यांना असलेले महत्त्व आजही कायम आहे. पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी नाते जपणारी ही कला कुंभारांच्या कष्टातून जिवंत राहिली आहे. संक्रांतीच्या निमित्ताने कुंभारांच्या हातातून घडणारी सुगडी ही केवळ सणाची गरज नसून, ती भारतीय संस्कृतीतील श्रम, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक म्हणून आजही आपले स्थान टिकवून आहेत.
कुंभार वाड्यात सुगडी बनविण्याची लगबग
सुगडी तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टाची आणि वेळखाऊ आहे. योग्य माती गोळा करणे, ती पाण्यात भिजवून मळणे, नंतर चाकावर ठेवून हळूहळू आकार देणे, वाळवणे आणि भट्टीत भाजणे हे सर्व टप्पे अत्यंत काळजीपूर्वक पार पाडावे लागतात. प्रत्येक सुगड्यात कुंभाराचा अनुभव, मेहनत आणि परंपरेचा वारसा उतरलेला असतो. संक्रांती जवळ येत असल्याने अनेक कुंभार कुटुंबे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
संक्रांतीसारख्या सणामुळे आमच्या पारंपरिक कलेला ओळख मिळते. आजही नागरिक मातीच्या सुगड्यांना प्राधान्य देतात, हे आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. सुगडी बनवताना मेहनत खूप लागते; पण आपल्या हातातून परंपरा पुढे जात आहे, ही भावना आम्हाला नवे बळ देते.
पांडुरंग दरेकर, कुंभार