

पिंपळे गुरव: स्मार्ट सिटी उपक्रम, कार्यक्षम प्रशासन आणि विविध नावीन्यपूर्ण योजनांसाठी राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळवणारी पिंपरी चिंचवड महापालिका मात्र अद्याप काही मूलभूत नागरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था. या उद्यानात दररोज हजारो नागरिक येत असतात. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यातून महापालिकेला भरघोस उत्पन्न मिळवून देण्यामध्ये राजमाता जिजाऊ उद्यानाचा महत्त्वाचा वाटा आहे. तरीही येथील सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय झाली असल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.
पाण्याची कमतरता
राजमाता जिजाऊ उद्यानाच्या परिसरात खाद्य टपऱ्यांच्या पाठीमागे उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात या शौचालयांची स्थिती अत्यंत खराब असून, ती नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. शौचालयात सर्वत्र अस्वच्छता असून, पाण्याची तीव कमतरता जाणवत आहे. बेसिन आणि भांडी आहेत, मात्र त्यांना नळ नाहीत. अनेक ठिकाणी पाईप तुटलेले किंवा गायब आहेत. शौचालयाची भांडी बसवलेली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची कोणतीही सोय नाही.
अंधाराचे सामाज्य
याशिवाय विद्युत व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडलेली आहे. तुटलेली वायरिंग, गायब दिवे आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी या शौचालयांचा वापर करणे धोकादायक ठरते. बाहेर आणि आत असलेल्या बेसिनमधील नळ गायब असल्याने हात धुण्यासारख्या मूलभूत स्वच्छतेच्याही सुविधा उपलब्ध नाहीत. या अस्वच्छ शौचालयांमुळे परिसरात तीव दुर्गंधी पसरली असून, उद्यानात फिरायला व्यायामासाठी किंवा कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते अशा अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्यास विविध आजारांचा धोका वाढतो. दूषित पाणी, संसर्ग, अस्वच्छता आणि अपुरी स्वच्छता यामुळे पोटाचे आजार, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शौचालयात पाणी नाही, दिवे नाहीत तसेच, नळही गायब आहेत. स्वच्छतागृहातून दुर्गंधी येते. संध्याकाळच्या वेळी आत जाणे धोकादायक वाटते. अशा अस्वच्छतेमुळे आजार पसरण्याची भीती आहे.
स्थानिक नागरिक
उपाययोजना करण्याची मागणी
या गंभीर समस्येकडे महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी सार्वजनिक शौचालयांची नियमित व योग्य स्वच्छता, शौचालयांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छ व सुरक्षित शौचालयांची व्यवस्था, कचरा टाकणे, थुंकणे व अस्वच्छ वर्तन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सदर बाबीची पाहणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठविण्यात येईल. पाहणीअंति जे काही नुकसान झालेले आढळून येईल त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल. तसेच, जर वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले तर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात येईल.
प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग महापालिका
देखभाल दुरुस्तीची मागणी
स्मार्ट सिटीचे फलक आणि पुरस्कार जपताना नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अशा मूलभूत सुविधा दुर्लक्षित राहू नयेत, अशीच अपेक्षा पिंपळे गुरवमधील नागरिक व्यक्त करत आहेत. स्मार्ट शहराची ओळख ही केवळ पुरस्कारांनी नव्हे, तर स्वच्छ सुरक्षित आणि सुसज्ज सार्वजनिक सुविधांमधूनच निर्माण होते, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शौचालयांची स्वच्छता व नियमित देखभाल करावी, अशी मागणी होत आहे.
शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटींची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. आरोग्य निरीक्षकांना याबाबत सूचना देण्यात येऊन त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्थापत्य विभागास दुरुस्ती कार्यवाहीसाठी अधिकृत पत्र देण्यात येईल.
शांताराम माने, मुख्य आरोग्य अधिकारी, ड क्षेत्रीय कार्यालय