Sangvi Bopodi Bridge Beautification: बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणामुळे वाहतूक वळवली; सांगवी परिसरात कोंडी
नवी सांगवी: जुनी सांगवी येथील बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणासाठी कमानीचे काम सुरू असून, कामासाठी येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे पूर्वीचा स्पायसर रस्ता आणि शितोळेनगर रस्त्यावर रहदारीचा ताण वाढला आहे. या कामामुळे सांगवी परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडणार आहे. तसेच, मुळा नदी पुलाचा परिसर अधिक देखणा व नागरिकांसाठी आकर्षक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांची गैरसोय
पुलावर उभारण्यात येणारी ही सुशोभीकरण कमान आधुनिक रचनेत साकारली जाणार असून, त्यावर प्रकाशयोजना व सौंदर्यवर्धक घटकांचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांगवी-बोपोडी दरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांना परिसराचा वेगळा आणि सुंदर अनुभव मिळणार आहे. दरम्यान, सुशोभीकरणाचे काम सुरक्षित व वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित कालावधीत पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहतूक बंदीमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
पुलामुळे रहदारीचा ताण कमी
जुनी सांगवी येथून पुण्यातील विविध भागात जाण्यासाठी मुळा नदीवरील स्पायसर औंध रोड रहदारीसाठी कमी पडत होता. वाढती वाहने व वर्दळीमुळे हा रस्ता अपुरा पडत होता. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची होत होती. सांगवी-बोपोडी नवीन पुलामुळे रहदारी विभागली गेल्याने येथील कोंडी कमी होणार आहे. मात्र, पुलाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने पुन्हा शितोळेनगर, स्पायसर रस्त्यावर रहदारी वाढली आहे.
या पुलामुळे रहदारी सुकर होण्यास मदत होत आहे. तसेच, इतर रस्त्यांवरील ताण कमी होईल. कमानीच्या सुशोभीकरणामुळे सांगवीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
रवींद्र निंबाळकर, अध्यक्ष, अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ
सांगवीच्या सौंदर्यात भर
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार म्हणून जुनी सांगवीची ओळख आहे. या नवीन पुलामुळे जुन्या सांगवीच्या सौंदर्यात भर पडत आहे. शांत नदीकिनारा परिसर आणि पलीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निसर्गमय परिसर, पुलालगत असलेला दत्त आश्रम परिसर आहे. यामुळे कधीकाळी निरव शांतता असलेला हा परिसर या नवीन पुलामुळे गजबजलेला आहे. या पुलामुळे रहदारी सुकर होण्यास मदत होऊन सांगवीच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे.
या पुलामुळे पुणे व इतर भागात जाण्याचे अंतर कमी झाल्याने इंधन व वेळेची बचत होईल. काम गतीने पूर्ण केल्यास इतर रस्त्यांवरील येणारा ताण कमी होईल.
जयश्री वगनवार, नागरिक
सुशोभीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचा परिसर अधिक आकर्षक दिसेल. सध्या कमान बसविण्याचे काम सुरू असून, साठ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर, उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागेल.
संध्या वाघ, कार्यकारी अभियंता, महापालिका

