

पिंपळे निलख: पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठ्या गाजावाजा करत झाडे लावा, झाडे जगवा असे घोषवाक्य देत रक्षक चौक रस्त्याच्याकडेला वृक्षारोपण केले होते. मात्र, त्यानंतर या झाडांकडे पुन्हा वळूनही पाहिले नसल्याचे धक्कादायक चित्र सध्या समोर आले आहे. घोषणांचा गाजावाजा आणि प्रत्यक्षातील उदासीनता यातील दरी येथे प्रकर्षाने जाणवत आहे.
संरक्षक जाळी गेली चोरीला
सध्या या मार्गावर स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम सुरू असून, रस्त्याच्याकडेला खड्डे खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान पदपथावर लावलेली अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काही जनावरांनी खाल्ली आहेत. तर, काहींच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्या अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या आहेत. नियोजनाअभावी आणि विभागीय समन्वयाच्या कमतरतेमुळे महापालिकेच्याच कामातून महापालिकेनेच लावलेली झाडे नष्ट होत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. बोलघेवड्या घोषणा, मुक्या झाडांचा आक्रोश पहायला मिळत असल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नागरिकांमध्ये नाराजी
एकीकडे पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम, घोषवाक्ये आणि जाहिरातबाजी सुरू असताना दुसरीकडे प्रत्यक्ष कामात झाडांच्या संरक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त केला जात आहे.
तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याची पहाणी केली जाईल व अभियंता किंवा जेसीबी चालक यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष झाले असल्यास ते परत व्यवस्थित करून दिले जाईल.
सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता, ड क्षेत्रीय, दळण-वळण विभाग
महापालिका केवळ फलक लावून पर्यावरणप्रेम दाखवत आहे. झाडे लावल्यानंतर त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी नाही. प्रशासनाकडून झाडे लावली जातात आणि दुसऱ्यासाठी तीच झाडे उखडली जातात. हा पर्यावरणाचा नव्हे, तर ढोंगीपणाचा कळस आहे. आता तरी महापालिकेने केवळ घोषणांऐवजी प्रत्यक्ष कृती दाखवावी.
सुनील बेनके, स्थानिक नागरिक
या ठिकाणची पाहणी करून संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल आणि परत उन्मळून पडलेल्या झाडांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला जाईल.
अनिल गायकवाड, ड क्षेत्रीय, उद्यान विभाग अधिकारी