Sangvi Post Office: सांगवीचे टपाल कार्यालय दापोडीत; ज्येष्ठ नागरिकांना रिक्षासाठी १२० रुपयांचा भुर्दंड

पुरामुळे कार्यालयाचे स्थलांतर; दापोडी शाखेवर वाढला कामाचा ताण, सांगवीतच नवीन जागेची नागरिकांची मागणी
Sangvi Post Office
Sangvi Post OfficePudhari
Published on
Updated on

सांगवी: सांगवीतील टपाल कार्यालय दापोडीत स्थलांतर केल्यामुळे नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रिक्षाभाड्यापोटी तब्बल १२० रुपयांचा (जाण्याचे ६० आणि येण्याचे ६० रुपये) मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. आयुष्यभराची जमापुंजी जपणे असो वा पेन्शनचा हक्काचा निधी मिळवणे असो, सांगवीतील कुंभारवाड्याजवळील हे डाक घर पुरामुळे पाण्यात बुडाले.

Sangvi Post Office
Lonavala Tourist Crowd: लोणावळ्यात ‘आखाड’ पार्ट्यांचा जल्लोष; पर्यटकांच्या गर्दीने पर्यटनस्थळे गजबजली, वाहतूक कोंडी

कार्यालयात पाणी भरल्याने महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे हे कार्यालय नाइलाजाने दापोडी येथील उपडाक कार्यालयात हलवावे लागले. या घडामोडीमुळे दापोडी कार्यालयावर कामाचा ताण वाढला आहे. यामुळे टपाल कार्यालयात विविध कामानिमित्त येणार्या नागरिकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही. यामुळे आमच्या टपाल कार्यालयासाठी कुणी प्रशस्त जागा उपलब्ध करून देईल का, असा उद्विग्न सवाल सांगवीकर विचारत आहेत.

Sangvi Post Office
Pavana Closed Pipeline Project: मावळ गोळीबाराला १५ वर्षे; पवना बंदिस्त जलवाहिनीचा विरोध कायम, प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याच्या हालचाली

ज्येष्ठ नागरिकांना होतोय मनस्ताप

सांगवीहून दापोडीतील कार्यालयात फेऱ्या मारण्यासाठी ऑटो रिक्षाने येणे-जाणे करण्यासाठी दररोज तब्बल १२० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. बसफेऱ्यांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे प्रवासात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नाइलाजाने बसने प्रवास करायचा ठरवला तरी, रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वृद्ध लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याआधी कुंभारवाड्यात असतानाही लोखंडी जिन्यावरून किंवा पायऱ्यांवरून ये-जा करताना वृद्धांना कसरत करावी लागायची. आता थेट दापोडीत कार्यालय गेल्यामुळे हा शारीरिक व मानसिक त्रास कैक पटींनी वाढला आहे.

Sangvi Post Office
Pimpri Hotels Food Safety: मुंढेंच्या धडक कारवाईचा इफेक्ट! हॉटेलच्या भिंतीवर आता ‘आम्ही काय देतो’चा खुलासा

प्रशासन, राजकीय उदासीनतेचा फटका

विस्तीर्ण पसरलेल्या सांगवी उपनगराला हक्काच्या डाक कार्यालयापासून वंचित राहावे लागत असून, यामागे प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. टपाल प्रशासनाकडून सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी योग्य समन्वयाअभावी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. गावठाण असो किंवा कुंभारवाडा, प्रत्येक वेळी जागा अपुरी पडल्याने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दस्तऐवजांचे मोठे नुकसान

दापोडी कार्यालयावर कामाचा ताण वाढला आहे. पुराच्या पाण्यात सांगवी कार्यालयातील दस्तऐवज भिजल्यामुळे तेथील रोजच्या व्यवहारांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. आता संपूर्ण कामकाज दापोडी शाखेत वर्ग झाल्यामुळे तेथील यंत्रणा आणि संगणकांवर (PC) कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. सांगवीत नवीन डाक घरासाठी हक्काची जागा मिळावी म्हणून कोणीही पुढे येऊन जागा उपलब्ध करून दिलेली नाही. ज्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

Sangvi Post Office
Sant Tukaram Maharaj Palkhi: हरिनामाच्या गजरात तुकोबारायांची पालखी पिंपरीत दाखल; वारकऱ्यांच्या स्वागताने शहर दुमदुमले

टपाल कार्यालय सांगवीतून थेट दापोडीत नेल्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. नियमित कामांसाठी किंवा पेन्शनसाठी दापोडीला जाण्या-येण्यात रिक्षावाल्याला तब्बल १२० रुपये द्यावे लागतात. हा आमच्यावर मोठा आर्थिक अन्याय आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन सांगवीतच लवकरात लवकर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

अर्चना काटे, ज्येष्ठ नागरिक.

सांगवीत नवीन जागेसाठी एक-दोन पर्यायांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. या प्रक्रियेत योग्य सहकार्य लाभल्यास आगामी एक ते दोन महिन्यांत सांगवीतच पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी कार्यालय पुन्हा सुरू केले जाईल. या तात्पुरत्या स्थलांतरामुळे सांगवीकरांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

नितीन बने, जनसंपर्क अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news