

पिंपरी: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांमध्येही नियमांची अंमलबजावणी करण्याची धावपळ सुरू झाली आहे. कारवाई होण्यापेक्षा ग्राहकांचा विश्वास टिकवणे महत्त्वाचे असल्याचे लक्षात आल्याने अनेक आस्थापनांनी ‘आम्ही नियम पाळतो’ हे दाखवून देण्यासाठी विविध सूचना फलक लावल्याचे चित्र आहे.
हॉटेल, कॅफेमध्ये गेल्यानंतर पूर्वी ग्राहकाने मेन्यू पाहायचा आणि पदार्थाची ऑर्डर द्यायची. मात्र, आता मेन्यूपेक्षाही आधी हॉटेलच्या भिंतीवरचे फलक लक्ष वेधून घेत आहेत. ‘सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध आहे’, ‘आमच्या पनीर डिशमध्ये पनीरच वापरले जाते’, ‘चीज अॅनालॉग वापरले जात नाही’, ‘कुकिंग ऑइलची माहिती’ अशा स्वरूपाच्या सूचना शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कॅफेंमध्ये झळकू लागल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईनंतर खाद्य आस्थापनांमध्ये नियमांचे पालन करण्याची लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
‘आम्ही काय देतो’ याचा खुलासा
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांना हॉटेल व्यवस्थापनाकडून आता फलकांच्या माध्यमातूनच उत्तरे दिली जात आहेत. काही हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी सुरक्षित असून ते ग्राहकांना विनामूल्य उपलब्ध असल्याची माहिती दर्शनी भागात लावण्यात आली आहे. ग्राहकांना पाण्यासाठी स्वतंत्रपणे पैसे मोजावे लागू नयेत, याबाबतही स्पष्टता देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पनीरच्या पदार्थांबाबतही काही हॉटेल्सने थेट माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ‘पनीरच्या पदार्थांमध्ये पनीरच वापरले जाते’, ‘चीज अनालॉग वापरले जात नाही’ अशा आशयाचे फलक ग्राहकांच्या नजरेस पडत आहेत. त्यामुळे पदार्थाची किंमत आणि चव याबरोबरच त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाबाबतही ग्राहक जागरूक होत असल्याचे दिसून येते.
ग्राहकही झालेत चौकस
पूर्वी हॉटेलमध्ये पदार्थ मिळाला की, त्याची चव आणि किंमत एवढेच ग्राहकाच्या चर्चेचे विषय असायचे. आता मात्र पनीर खरे आहे का, तेल कोणते वापरले आहे, पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का, स्वयंपाकघराची स्वच्छता कशी आहे, याकडे ग्राहकांचे लक्ष जाऊ लागले आहे. अन्नाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने होणाऱ्या कारवाया आणि जनजागृतीमुळे ग्राहकांमध्येही प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनालाही केवळ चव आणि आकर्षक सजावटीवर भर न देता स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची माहिती ग्राहकांसमोर ठेवावी लागत आहे.
तेल कोणते? पाण्याची खात्री काय?
काही मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाची माहितीही सार्वजनिक करण्यात आली आहे. रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल अथवा कोणत्या प्रकारचे कुकिंग ऑइल वापरले जाते, याची माहिती फलकावर नमूद करण्यात येत आहे. यामुळे हॉटेलच्या स्वयंपाकघरात नेमके काय चालते, हा आतापर्यंत ग्राहकांच्या कुतूहलाचा विषय असलेला मुद्दा आता काही प्रमाणात पारदर्शक होताना दिसत आहे.
हॉटेलमध्ये गेल्यावर पाणी सुरक्षित आहे की नाही, पनीर खरंच पनीर आहे की दुसरे काही, हे आम्हाला पूर्वी कळायचे नाही. आता हॉटेलमध्येच माहितीचे फलक लावलेले दिसत आहेत. त्यामुळे ग्राहक म्हणून काय खातोय, काय पितोय याची माहिती मिळते. प्रशासनाची कारवाई सुरू राहण्याबरोबरच हॉटेल व्यवस्थापनानेही ही पारदर्शकता कायम ठेवली पाहिजे.
सुशांत कोळेकर, ग्राहक