

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षासोबत युती झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शिवसेनेला 15 जागा सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपाचे सर्व 128 जागांचे गणित फिसकटले असून, स्थानिक पदाधिकारी अडचणीत आले आहेत.
महापालिकेच्या मागील निवडणुकीत 128 पैकी भाजपाचे 77 नगरसेवक होते. भाजपाची एकहाती सत्ता होती. तर, शिवसेनेचे केवळ 9 नगरसेवक होते. त्या निवडणुकीत युती झाली नव्हती. यंदा भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा देत 128 जागांची तयारी केली आहे. पक्षाकडे सर्वांधिक इच्छुक असून, त्यांच्या मुलाखती मंगळवारी (दि.16) आणि बुधवारी (दि.17) अशा दोन दिवसांत पूर्ण झाल्या आहेत. मुलाखतीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह इतर पक्षाच्या इच्छुकांनीही हजेरी लावली होती.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपा स्वबळाबर लढणार असून, महायुतीतील पक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी घोषणा सोमवारी (दि.15) केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना हे पक्षही स्वबळावर लढणार असे चित्र निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने पावले टाकली जात असल्याचे दिसत आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच, भाजपा आणि शिवसेनेचे काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने महायुती फुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणुकीचे वातावरण तापत असताना भाजपा व शिवसेना युती होणार असे चित्र बुधवारी (दि.17) तयार झाले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मंगळवारी (दि.16) बैठक घेत चर्चा केली. तसेच, आज मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत पिंपरी-चिंचवडसंदर्भात महत्त्वपूर्व बैठक झाली. शिवसेनेने तब्बल 42 जागांची मागणी केल्याचे समजते. तर, भाजपाकडून शिवसेनेसाठी 15 जागांसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपा आणि शिवसेना युती जवळजवळ फायनल झाल्यात जमा आहे. त्यामुळे शिवसेनेतून भाजपात जाणाऱ्या माजी नगरसेवक व इच्छुकांची गोची झाली आहे. काठावर असलेल्या इच्छुकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युती झाल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षांतराच्या तयारीत असलेले कात्रीत सापडले आहेत. त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या जय महाराष्ट्राचा नारा दिला आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे पुन्हा बोलणी करून साकडे घालण्यात येत असल्याचे चित्र आहे.
तर, स्वबळाचा तयारी अंतिम टप्प्यात असताना ऐनवेळी शिवसेनेला 15 जागा दिल्या गेल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांचे गणित बिघडले आहे. शिवसेनेच्या जागेवर भाजपाने प्रबळ व सक्षम इच्छुक शोधले होते. त्या इच्छुकांनी मोठी तयारीही सुरू केली होती. युतीमुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या जागांवर लढता येणार नसल्याने त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. तसेच, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे निवडणूक समीकरण बिघडले आहे. त्या 15 जागांवर भाजपाचा उमेदवार देता येणार नसल्याने प्रभागातील पॅनेलमध्येही मोठा बदल पाहावयास मिळणार आहे. या युतीचा शिवसेनाला सर्वांधिक फायदा होईल, असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे.
भाजपा युतीबाबत सकारात्मक
शिवसेना आणि भाजपा युतीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षाचे नेते खासदार श्रीरंग बारणे हे भाजपाच्या नेत्यांशी बोलणी करीत आहेत. महायुतीबाबत भाजपा सकारात्मक असल्याचे चित्र आहे. अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दिल्लीवरून आल्यानंतर खा. बारणे हे त्यासंदर्भात माहिती देतील, असे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुख राजेश वाबळे यांनी सांगितले.