

देहूरोड: मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड येथील संविधान चौक येथे असलेला वाहतूक सिग्नलचा खांब पडल्याने महामार्गावरील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या घटनेमुळे हजारो वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली असून, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अपघाताची भीती
संविधान चौक (सेंट्रल चौक) हा देहूरोड परिसरातील अत्यंत वर्दळीचा चौक असून, मुंबई-पुणे व बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची येथे दिवसभर मोठी गर्दी असते. अशा महत्त्वाच्या चौकात वाहतूक सिग्नलचा खांब कोसळल्यामुळे वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. सिग्नल बंद पडल्याने वाहनचालकांना अंदाजाने वाहन चालवावे लागले, परिणामी चौकात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाहनांच्या रांगा
विशेषतः कार्यालयीन वेळेत, शाळा-महाविद्यालयांच्या सुटीच्या सुमारास तसेच अवजड वाहतूक सुरू असताना या घटनेचा मोठा फटका बसला आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक वाहनचालकांना तासनतास कोंडीत अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवांची वाहने तसेच सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला असून, या घटनेमुळे अपघाताचा धोकादेखील वाढला होता. सिग्नल नसल्याने काही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत चौक ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता टळली जाऊ शकत नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले, की सिग्नलचा खांब जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. वेळोवेळी देखभाल न झाल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोपही प्रशासनावर करण्यात येत आहे. वाहतुकीचा ताण मोठा असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नवीन सिग्नल बसविण्याची मागणी
दरम्यान, महामार्ग प्रशासनाने तातडीने पडलेला सिग्नलचा खांब हटवून नवीन सिग्नल बसवावा. तसेच, चौकातील इतर सिग्नल आणि खांबांची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नियमित देखभाल व ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील पायाभूत सुविधांच्या देखभालीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.