

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा आमदार सुनील शेळके व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, वराळे पंचायत समिती गणातील उमेदवारीबाबत भाजप कोअर कमिटी अध्यक्षांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देत या गणातील उमेदवारी नंतर जाहीर करू, असेही स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे, नारायण ठाकर, प्रकाश पवार, प्रवक्ते राज खांडभोर, युवक अध्यक्ष किशोर सातकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुशांत बालगुडे आदी उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष खांडगे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 गटांतील व पंचायत समितीच्या 10 पैकी 9 जागांवरील पक्षाचे उमेदवार जाहीर केले.
भाजपची दुटप्पी भूमिका
या वेळी आमदार शेळके यांनी बोलताना युतीबाबत भाजपच्या स्थानिक नेत्याकडून होत असलेल्या दुटप्पी भूमिकेबाबत टीका केली. एकीकडे प्रस्ताव द्यायचा आणि आमचाच उमेदवार पळवून न्यायचा, स्थानिक नेत्यांनी युती करणार नाही म्हणायचे आणि वरिष्ठ नेत्यांनी युतीसाठी फोन करायचे असे प्रकार भाजपकडून सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांनी कुठलाही प्रस्ताव आणू नये आम्ही निवडणूक लढायला सज्ज आहोत, असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीची रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाशी युती
दरम्यान, भाजप कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे यांनी वराळे पंचायत समिती गणात राजेंद्र कडलक यांना उमेदवारी दिल्यास आम्ही उमेदवारी घेणार नाही, असा प्रस्ताव दिला होता. आज आम्ही कडलक यांना उमेदवारी जाहीर करतो, त्यांना 24 तासांचा वेळही देतो, त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असे खुले आव्हान देऊन अन्यथा आम्ही अतुल मराठे यांना उमेदवारी देणार असल्याचेही सांगितले. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युतीच्या माध्यमातून लढविणार आहे. रिपब्लिकन पक्षाला खडकाला पंचायत समिती गणामध्ये उमेदवारीची संधी दिली असून, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षालाही आगामी काळात योग्य पदाची संधी दिली जाईल, असेही आमदार शेळके व तालुकाध्यक्ष खांडगे यांनी स्पष्ट केले.
यात काही खोटं असेल तर आज उमेदवारी मागे घेतो
इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार प्रशांत भागवत यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून, त्यांनी दिलेले सर्व प्रस्ताव व व्यक्त केलेल्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या होत्या. पती-पत्नी अशा दोघांना संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला होता. त्यांनीही त्यास होकार दर्शवला होता, असा खुलासा करत यासंदर्भात काही खोट असेल तर भागवत यांनी सांगावं मी जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतो, असे थेट आव्हान आमदार शेळके यांनी भागवत यांना दिले.
जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार
टाकवे बु - नाणे गट : अनंता पावशे
वराळे - इंदोरी गट : पल्लवी संदीप दाभाडे
खडकाळा - कार्ला गट : दीपाली दीपक हुलावळे
कुसगाव - काले गट : संतोष गबळू राऊत
सोमाटणे - चांदखेड गट : मनीषा नितीन मुऱ्हे
पंचायत समिती गणनिहाय उमेदवार
टाकवे बु गण : प्राची देवा गायकवाड
नाणे गण : आशा ज्ञानेश्वर मोरमारे
इंदोरी गण: दिलीप नामदेव ढोरे
कार्ला गण : रेश्मा राजू देवकर
खडकाळा गण : समीर खंडू जाधव
कुसगाव गण : योगेश मुरलीधर लोहोर
काले गण : शैला रामचंद्र कालेकर
सोमाटणे गण : साहेबराव नारायण कारके
चांदखेड गण : सुनिता मनोहर येवले