

वडगाव मावळ: येथील केशवनगर आणि सांगवी ग्रामस्थांना येण्याजाण्यासाठी एकमेव असलेला रेल्वे गेटचा मार्ग तीन दिवस बंद राहणार असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून जवळच असलेला भुयारी मार्ग खुला करण्यासाठी नगरसेवक पंढरीनाथ ढोरे यांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाला आणि अवघ्या तासाभरात वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
पाठपुराव्याला यश
वडगाव शहरातील मोठ्या लोकवस्तीचा असणारा केशवनगर भाग व सांगवी ग्रामस्थांना वडगाव शहरात जाण्यासाठी केशवनगर रेल्वेगेट हा एकमेव मार्ग आहे. याठिकाणी रेल्वेचे रुळ बदलण्याचे काम सुरू असल्याने सलग तीन दिवस गेट बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना रेल्वे विभागाने दिली होती. त्यामुळे केशवनगर व सांगवी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागणार होता.
यावर पर्याय म्हणून गेटजवळ श्री शितळादेवी मंदिराशेजारी असलेला भुयारी मार्ग मोकळा करण्याची संकल्पना नगरसेवक पंढरीनाथ ढोरे यांनी रेल्वेचे अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे मांडली. तसेच, नगरसेवक दिनेश ढोरे, पूनम भोसले, रोहित धडवले यांनीही यासाठी रेल्वे विभागाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. उद्योजक सुनीत कदम यांनी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून दिला आणि अवघ्या एक तासात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
नागरिकांची झाली सोय
यामुळे या मार्गाने रिक्षा, दुचाकीने सहज प्रवास करता येत असल्याने नागरिकांचा केवळ तीन दिवसांचा नव्हे तर वर्षांनुवर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच, याच भागातून पलीकडे असलेल्या रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमध्ये रेल्वे लाईन ओलांडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मोठी सोय झाली आहे.
रेल्वे गेटमुळे केशवनगर व सांगवी ग्रामस्थांना प्रवास करताना अडचण निर्माण होत होती. तसेच, रेल्वे लाईनच्या कामामुळेही अनेकदा दोन-दोन दिवस हा मार्ग बंद ठेवावा लागत होता. आता भुयारी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असून, कायमचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच, उड्डाणपुलाचेही काम सुरू असून, येत्या दोन वर्षांत हे कामही पूर्ण होणार आहे.
पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक