Waste Management PCMC: शंभर किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचे सर्व्हेक्षण

“घनकचरा व्यवस्थापन आणि योग्य वर्गीकरणासाठी महापालिकेचा उपक्रम; सोसायट्या, कंपन्या, मंगल कार्यालये आणि संस्थांमध्ये जनजागृती”
Waste Management PCMC
Waste Management PCMCPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचर्‍याचे प्रभावी व्यवस्थापन, कचर्‍याचे योग्य वर्गीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने शंभर किलोहून अधिक कचरा निर्माण करणार्‍या हाऊसिंग सोसायट्या व इतर आस्थापनांचा सर्व्हे करून नोंदणीवर भर दिला आहे.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारा परिसर, हाऊसिंग सोसाट्या, मंगल कार्यालय, कंपन्या, कॅण्टीन, वसतिगृह, शैक्षणिक संस्था, बाजारपेठ, मंडई परिसरात जनजागृती केली जात आहे.

मोशी कचरा डेपोतील झालेल्या दुर्घटनेनंतर शहरात कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा डेपोची क्षमता संपली असतानाही मोशीत कचरा अद्यापही टाकला जात आहे. महापालिका प्रशासनाने शहरात दहा ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रासाठी जागा जाहीर केल्या आहेत.

मात्र, या जागांना स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांचा विरोध वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे.

Waste Management PCMC
Pimpri Chinchwad Degue Malaria Cases: सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ७० तर मलेरियाचेही ८ रुग्ण पॉझिटिव्ह

भविष्यात कचर्‍याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील हाऊसिंग सोसायट्या, गृहसंकुले, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, कार्यालये, मंगल कार्यालय, कॅण्टीन, वसतिगृह, व्यावसायिक आस्थापना तसेच, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणार्‍या अन्य संस्थांपर्यंत जाऊन नोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे कर्मचारी नागरिकांशी संवाद साधत आहेत.

विविध व्यापारी संकुले, आस्थापनांना भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांची माहिती देत आहेत. त्यामुळे घरोघरी भेट देणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कचर्‍याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारांत योग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ओल्या कचर्‍यावर संबंधित परिसरातच प्रक्रिया करून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यावरही महापालिकेने भर दिला आहे.

Waste Management PCMC
Ambegaon Wild Vegetables: सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांची मेजवानी

शंभर किलोहून (बल्क वेस्ट जनरेटर्स) अधिक कचरा निर्माण करणार्‍या आस्थापनांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://swm.cpcb.gov.in/register या संकेतस्थळाचा वापर करावा. नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच संबंधित आस्थापनांची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देत आहेत.

कचर्‍याचे निर्माण होण्याच्या ठिकाणीच योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जास्त कचरा निर्माण करणार्‍यांनी वर्गीकरण, प्रक्रिया आणि नोंदणी या तिन्ही बाबींना प्राधान्य द्यावे. कचरा योग्य पद्धतीने हाताळला नाही, तर त्याचा आरोग्य व पर्यावरणावर परिणाम होतो. कचर्‍याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आस्थापनांचा सर्व्हे करून नोंदणीसाठी स्वतंत्र एजन्सीचीही नियुक्ती केली जाणार आहे.

- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news