

पिंपरी : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी अवैध देहव्यापाराचा प्रकार उघडकीस आणला आहे. हिंजवडी, चाकण या ठिकाणी छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पाच महिलांची सुटका केली आहे.
या पथकाने शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर) सायंकाळी चाकण येथील आळंदी फाट्याजवळील लॉजवर छापा टाकला. या कारवाईत पाच महिलांची वेश्या व्यसायातून सुटका केली. लॉजचालक गजानन सटवाजी आव्हाड (28) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मागील आठवड्यात हिंजवडीतील एका ‘स्पा’मधील एका महिलेची, तर रावेत येथील स्पामधील दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली होती. संबंधित मस्पाफ चालक व मालकांवर गुन्हे नोंदवले आहेत.
या पथकाने वर्षभरात 26 आस्थापनांवर छापे टाकले. यात 6 स्पा/मसाज पार्लर, 7 हॉटेल, 3 फ्लॅट व 10 ऑनलाइन वेश्या व्यवसाय प्रकरणांचा समावेश आहे. या कारवायांत 42 संशयितांना अटक तर 55 पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी 65 गुन्ह्यांत 97 महिलांवर पिटा कायदा कलम 8 अन्वये कारवाई केली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे निरीक्षक नितीन गिते, सहायक निरीक्षक भास्कर पुल्ली, सहायक फौजदार सुनील शिरसाट, पोलिस हवालदार भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, श्रध्दा भरगुडे, वैष्ण्वी गावडे, निलम बुचडे, संगीता जाधव, उदयकुमार भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अवैधरित्या स्पा व मसाज पार्लरच्या आडून चालणाऱ्या देहव्यापार प्रकारावर कारवाई करत वाकड, हिंजवडी व सांगवीतील स्पा व एक रहिवासी फ्लॅट अशा चार आस्थापना एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.