

पिंपळे गुरव : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लायन सर्विसेस लिमिटेड या कंत्राटदाराकडील स्वीपिंग मशीनची दयनीय अवस्था सध्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे. रस्त्यावरील धूळ, माती व कचरा गोळा करून रस्ता स्वच्छ करण्याऐवजी हीच मशीन परिसरात धूळ उडवत असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. यामुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होत आहे की प्रदूषण वाढत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
स्वच्छतेच्या नावाखाली धुळीचा मारा सुरू असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मशीनमधून उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यावरील वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे.
स्वीपिंग मशीनवर एक ऑपरेटर आणि एक मदतनीस अशी दोनच माणसे कार्यरत असतात. मशीनमध्ये पाण्याचे चार स्प्रे बसवले असले तरी प्रत्यक्षात एकाही स्प्रेचा वापर होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे धूळ हवेत उडत असून, आसपासच्या नागरिकांना श्वसनासंबंधी त्रासही जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी महापालिकेचे साफसफाई कर्मचारी उपलब्ध असतानाही स्वीपिंग मशीनचा वापर करून रस्त्यांची सफाई का केली जाते, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पिंपळे गुरव भागासाठी स्वीपिंग मशीनचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असूनसुद्धा अनेक रस्ते धुळीने माखलेले दिसत असल्याने स्वीपिंग मशीनची कार्यक्षमता तसेच कंत्राटदाराच्या कामकाजाबद्दल चौकशीची मागणी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि दैनंदिन वाहतुकीला धोका पोहोचवणाऱ्या या धुळीच्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्याची स्वच्छता करण्याऐवजी मशीन धूळ हवेत फेकते. महापालिकेने स्वच्छतेसाठी मशीन आणली पण तीच आता नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. - स्थानिक
ही बाब आमच्या लक्षात आली आहे. याबाबत आम्ही त्यांना लेखी पत्र देऊन स्पष्ट सूचना देणार आहोत. आतापर्यंत ते दिवसा फिरत होते, पण आता रात्रीच्या वेळी कामकाज करतील. प्रत्येक वाहनासोबत पाहणीसाठी एक स्वतंत्र कर्मचारी ठेवला जाईल. पाणी न वापरणे किंवा नीट काम न करणे, अशा चुका यापुढे होऊ दिल्या जाणार नाहीत. संपूर्ण कामावर एसआय यांचे नियंत्रण राहील. त्यामुळे पुढील काळात नक्कीच सुधारणा होईल.
प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, मनपा
मेन्टेनन्स टीमशी बोलून कोणती अडचण किंवा तांत्रिक समस्या आहे का ते तपासून घेतले जाईल. आवश्यक माहिती घेतल्यानंतर त्या अडचणी तात्काळ दूर केल्या जातील. नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल.
सागर साळुंखे, सहाय्यक व्यवस्थापक, आरोग्य विभाग, मनपा