

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 32 जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. कालपर्यंत 7 अर्ज मागे घेतले गेले होते. त्यापैकी 19 जागांवरील उमेदवारांच्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ 9 जागांवर लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, नगराध्यक्षपदासाठी दोघांनी त्यांचे अर्ज आज मागे घेतल्याने आता नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक तिरंगी होणार आहे. महायुतीचे संतोष हरिभाऊ दाभाडे तर किशोर छबुराव भेगडे आणि रंजना रघुनाथ भोसले हे दोन्ही अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाचा शर्यतीत आहेत.
प्रभाग 2 अ मध्ये चौरंगी लढत होणार आहे. त्यात वीणा जयंत कामत, ऋतुजा विजय काळोखे, तनुजा सुरेंद्र दाभाडे आणि विभावरी रवींद्रनाथ दाभाडे हे चार उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग 3 अ मध्ये अनिता अनिल पवार आणि वीणा संदीप शिंदे यांच्यात थेट लढत होईल. तर 3 ब मध्ये सिद्धार्थ गोरख दाभाडे विरुद्ध विशाल साहेबराव लोखंडे यांच्यात सामना होईल.
प्रभाग 5 अ मध्ये आरती नितीन धोत्रे आणि भारती सुरेश धोत्रे यांच्यात थेट लढत होणार आहे.
प्रभाग 7 ब मध्ये चिराग सुरेश खांडगे विरुद्ध सूरज शंकर कदम एकमेकांसमोर असून दुरंगी लढत होईल.
प्रभाग 8 अ मध्ये मनीषा हनुमंत म्हाळसकर आणि स्नेहल संकेत म्हाळसकर या आमने सामने आहेत. तर 8 ब मध्ये अमोल जगन्नाथ शेटे विरुद्ध सुदाम शंकरराव शेळके हे उमेदवार आहेत.
प्रभाग 10 अ मध्ये पंचरंगी लढत होत आहे. त्यात मजनू हनुमंत नाटेकर, सचिन सुरेश पवार, अरुण बबन माने, करुणा प्रकाश सरोदे आणि स्वप्नील संजय निकाळजे हे उमेदवार आहेत. तर 10 ब मध्ये संगीता सतीश खळदे आणि सपना गिरीश करंडे या दोघींमध्ये सामना होणार आहे.
3 उमेदवार बिनविरोध
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदाच्या तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली असून, वेगवेगळ्या प्रभागांतून नगरसेवक पदाच्या 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यामध्ये भाजपच्या दोन नगरसेवकांसोबत अडीच अडीच वर्षांचा फॉर्मुला वापरला व तो यशस्वीदेखील झाल्यामुळे तुंगार्ली प्रभाग क्रमांक दोनमधील एक महिला उमेदवार अनिता संदीप अंभोरे बिनविरोध झाल्या आहेत. तर, वलवन प्रभाग क्रमांक तीनमधील स्पर्धा कमी झाली आहे. याच प्रभागामधील अनुसूचित जाती या आरक्षित जागेवरील एक महिला श्वेता चंद्रकांत गायकवाड या बिनविरोध झाल्या आहेत. या दोन्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. तर, उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक सातमधील एका महिला उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे देविदास कडू हेदेखील बिनविरोध झाले आहेत.
लोणावळा शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमधील उमेदवारांना अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला देत अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्याचा आमदार सुनील शेळके यांनी प्रयत्न केला. दोन ठिकाणी त्यांना यश आले आहे. तर, काही ठिकाणी थोडक्यात बोलणे हुकले आहे. लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या पदासाठी एकूण दहा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन जणांनी माघार घेतली असून, सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीत अखेर नगराध्यक्षपद व काही प्रभाग वगळता बहुतांश प्रभागात नगरसेवक पदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या एक व नगरसेवक पदाच्या 19 असे एकूण 20 जणांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज नगराध्यक्ष पदाच्या सुनंदा म्हाळसकर यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नगरसेवक पदाच्या 19 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान, काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे गेली तीन दिवस संबंधित बंडखोर उमेदवारांना थांबविण्यासाठी नेत्यांची पराकाष्ठा झाली. तरीही काही प्रभागांमध्ये अजूनही अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने सबंधित प्रभागांमध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्या अपक्ष उमेदवारांशीही सामना करावा लागणार आहे.