

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बस थांबा परिसरात रिक्षाचालकांचा विळखा वाढत आहे. बस थांब्याभोवती बेशिस्तपणे रिक्षा थांबवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्याकडून दोन दक्षता पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र अद्यापी पिंपरी चिंचवड शहरात दक्षता पथके स्थापन करण्यात आली नसून, ही पथके केवळ कागदावरच असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निगडी प्राधिकरण येथे पीएमपीचा मुख्य थांबा आहे. मुख्य थांबा असल्याने हजारोंच्या संख्येने प्रवाशांची येथे वर्दळ असते; मात्र या बसथांब्याला रिक्षांचा विळखा पडलेला असतो. पुणे शहरात बस थांब्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांवर पीएमपीच्या दक्षता पथकाकडून कारवाईचे सत्र सुरु आहे; परंतु पिंपरी- चिंचवड शहरातील रिक्षाचालकांवर दक्षता पथकाकडून कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत पीएमपीकडून प्रवासी सेवा देण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यात दोन हजारापेक्षा आधिक बसगाडया आहेत. त्यापैकी 1600 ते 1700 बस सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जातात. प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळऱ्यात त्रास होऊ नये, याकरिता नवीन शेड उभारण्यात आलेले आहे.
पीएमपीच्या बसथांब्यापासून 50 मीटर अंतरावर वाहने उभी करण्यास सक्त मनाई आहे. परंतु, अनेक रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने आपली वाहने उभी करतात. फेरीवालेदेखील थांब्याच्या शेजारीच विक्री करताना आढळून येतात. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर बसची वाट पाहत उभे राहणे मोठे त्रासाचे होते. प्रवाशांना बस पकडतानादेखील वाट मिळणे मुश्किल होते. अनेकवेळा तर बसच्या आधी रिक्षाचालक येऊन थांबतात; मात्र या मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.
शहरात पीएमपीच्या थांब्यापासून 50 मीटर परिसरात वाहने उभी केल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी पीएमपीकडून दोन पथके नेमण्यात आली आहेत.
यशवंत हिंगे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल