

गणेश खळदकर
पुणे : जेईई मेन्सच्या धर्तीवर राज्यात दोनदा सीईटी घेण्याचा निर्णय चांगला असून, विद्यार्थ्यांना एक वाढीव संधी मिळण्याबरोबरच गुणात्मक वाढ करता येणार आहे. तसेच, 2026 मध्ये एप्रिल, मे महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात अशी तीनदा सीईटी परीक्षा होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी सीईटीचा ट्रिपल धमाका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळा घेण्यात येणार असून, पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-2026 मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे 2026 मध्ये घेण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून 2026 चे प्रवेश होतील.डिसेंबर 2026 मध्ये घेण्यात येणारी तिसरी सीईटी परीक्षा आणि एप्रिल 2027 मध्ये घेण्यात येणारी परीक्षा या माध्यमातून 2027 मधील प्रवेश राबविले जाणार आहेत.
पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी दशेत परीक्षा देत असताना अनेक चुका होत असतात. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळणे गरजेचे असते. जेईई मेन्स वर्षातून दोनदा होत असल्यामुळे सीईटी देखील दोनदा घेण्याची मागणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलकडे गेल्या अनेक वर्षांपासून केली होती. हा एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्या, तर त्याला दोन्हींपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील त्या प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. यातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देता येणार आहे.
दोनदा सीईटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या परीक्षेत झालेल्या चुका सुधारण्याची त्यांना संधी मिळणार असून, दुसर्या परीक्षेत गुण वाढविता येणार आहेत. यामाध्यमातून दरवर्षी प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब देखील टळणार आहे.
डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक, व्यवस्थापनशास्त्र प्रशाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यार्थ्यांना अनेकवेळा परीक्षेच्या दरम्यान काही ना काही अडचणी येतात. त्यामुळे त्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी दोन सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी सीईटी देणे हे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण नाही. दोन सीईटी परीक्षा घेणे हे आमच्यासाठी देखील आव्हानात्मकच असणार आहे. पुढील वर्षी दोन सीईटी परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा अंदाज येणार आहे. परंतु 2027 च्या प्रवेशासाठी आम्ही डिसेंबर 2026 आणि एप्रिल 2027 मध्ये सीईटी परीक्षा घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला मोठ्या प्रमाणात वेळ मिळेल. तसेच सीईटीसेलला देखील दोन्ही परीक्षांचे आयोजन करणे सोपे जाणार आहे.
दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष
मला गेली 15 वर्षे प्रवेश प्रक्रियेचा व्यापक अनुभव असून, या निर्णयाचा विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा फायदा होणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार असून, स्वतःचा परफॉर्मन्स सुधारण्याची वास्तविक संधी त्यांना उपलब्ध होईल. एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर अनेक पदवीधरांना एमबीए करायचे असते; परंतु काही विद्यार्थ्यांना एमबीए सीईटीबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे एमबीए इच्छुक विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे सीईटी देण्याची अधिक चांगली संधी मिळणार आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय करिअर घडविण्याची एक नवी वाट उघडणार आहे.
प्रा. उद्धव शिद, संचालक, झील एज्युकेशन सोसायटी, पुणे