

पिंपरी : पार्थ पवार प्रकरणानंतर शहरात बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादीचे आगामी महापालिका निवडणुकीत पानिपत करण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात शत-प्रतिशत भाजपासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह तब्बल दहा माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत.
शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले असून, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपाच्या लाटेत 77 नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादीच्या 32 जणांनी विजय मिळविला होता. अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेतल्यानंतर शहरात भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. महापालिकेवर पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरूआहेत.
पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी कच खाल्ल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहरात भाजपा आमदारांचे वर्चस्व आणि नुकताच बिहारमध्ये मिळालेल्या बलाढ्य विजयामुळे शहर भाजपामध्ये उत्साह संचारला आहे. शहरात भाजपाला अनुकूल वातावरण असल्याने इच्छुकांची संख्या वाढत आहे. शत-प्रतिशत भाजपा आणि ‘शंभर पार’ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. त्यामुळे आपल्या तगड्या उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तगड्या उमेदवारांना भाजपामध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच हा पक्षप्रवेश घेऊन राजकीय खळबळ उडवण्याच्या तयारीत भाजपा आहे.
शत-प्रतिशत भाजपासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. भाजपाच्या निष्टषावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होवू न देता शहराच्या विकासासाठी शंभरहून अधिक नगसेवक निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुआहेत.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहाहून अधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, त्यांना भाजपात येण्याची इच्छा आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले असून, ते लवकरच निर्णय घेतील.
शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.
महापालिका निवडणुकीत महायुती फुटल्यामुळे भाजपा सर्व अर्थात 128 जागा लढवू शकते. याबाबत पक्षाने नुकताच एक सर्व्हे केला असून, तो पक्षाला अनुकूल वातावरण दर्शवत आहे; मात्र 2017 च्या 77 नगरसेवकांचा आकडा ओलांडून शंभरी पार करण्यासाठी अजून तगड्या उमेदवारांची भाजपाला आवश्यकता आहे. त्यामुळे निवडून येण्यास सक्षम असलेले राष्ट्रवाद (अजित पवार गट) पदाधिकारी व माजी नगरसेवकांना ‘टप्प्यात’ घेऊन राष्ट्रवादीचा ‘कार्यक्रम’ करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक भाजपाच्या गळाला लागले आहेत, अशी चर्चा आहे. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक इच्छुकांनी पक्षांतर करून भाजपाच्या लाटेचा फायदा उचलला होता. त्याचप्रमाणे आताही तोच ‘पॅटर्न’ राबविला जाण्याची शक्यता आहे.
तिकिटासाठी शहरातील 32 प्रभागांंध्ये भाजपाच्या शेकडो इच्छुकांनी शड्डू ठोकले आहेत. उपऱ्यांना संधी न देता निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी होत आहे. असे असताना राष्ट्रवादीतून कार्यकर्ते आयात करून तिकिटे दिल्यास भाजपामधील नाराजी वाढू शकते; मात्र ज्याठिकाणी भाजपाची ताकद आहे, ते प्रभाग सोडून जेथे राष्ट्रवादीची ताकद आहे, तेवढ्याच प्रभागात ‘ऑपरेशन लोटस’चे नियोजन झाले आहे.
भाजपा पक्ष हा विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेने उभा असल्याने केवळ लाभाचे राजकरण म्हणन इतर पक्षातून इनकमिंग करू नये, अशी भूमिका भाजपातील काही कर्यकर्त्यांकडून केली जात आहे. माजी प्रवक्ते अमोल थोरात यांनी याबाबत मंगळवारी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. गूळ असला की मुंग्या येतात, असे चित्र भाजपामध्ये दिसत आहे. सत्ता आहे, म्हणून इनकमिंग वाढत आहे. कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार, आमदारांवर खालच्या पातळीत टीका करणारे आणि भाजपाला त्रास देणारे इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आज केवळ भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून कट्टर भाजपा कार्यकर्ते म्हणून मिरवत आहेत. हे लोक भविष्यात पक्षासाठी काम करतील का, असा सवाल थोरात यांनी केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.