

पिंपरी: शिक्षण हक्क कायदा 25 टक्के प्रवेशप्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणीदरम्यान आकुर्डी आणि पिंपरी आरटीई कागदपत्र पडताळणी केंद्रावर नियमात नसलेली कागदपत्रे मागितल्यामुळे प्रवेश रखडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. तर, काही पालकांनी एक किलोमीटर अंतराच्या अटीमुळे चुकीची कागदपत्र सादर केल्याचे उघडकीस आले आहे.
आकुर्डीतील कै. वसंतदादा पाटील विद्यामंदिर आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्रावर सध्या आरटीई प्रवेशप्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या दोन्ही केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी 13 एप्रिलपासून सुरू आहे. कागदपत्र पडताळणी केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे प्रक्रियेला विलंब होत आहे.
सध्या मूळ कागदपत्रांशिवाय काही ठिकाणी अनावश्यक कागदपत्रांचा आग््राह धरला जात आहे. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालकांना अडचणी येत आहेत. पडताळणी समितीच्या प्रक्रियेतही अर्जदारांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक न दिल्याने त्रुटींची माहिती मिळत नाही. पालकांना केवळ तहसीलदार स्तरावरील उत्पन्नाचा दाखला (1 लाखापेक्षा कमी) आणि निवासी पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
मुळशी तालुक्यातील शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेत शाळा वर्ग झाल्या आहेत. प्रवेशपत्रावर चुकीचे पडताळणी केंद्र नमूद असल्याने पालकांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर (उदा. पौड, पिंपरी, आकुर्डी) फेऱ्या माराव्या लागत आहेत. पुनावळे, ताथवडे येथील नामांकित शाळा मिळविण्यासाठी काही पालकांनी घरचा पत्ता बदलला आहे. पडताळणी समिती सदस्यांनी आरटीई पालकांच्या घरी पडताळणीला गेल्यास घरे बंद असतात. अनेक पालक स्थलांतरीत झाले आहेत. अनेकांनी शाळा पाहून भाडेकरार दाखविला आहे. अनेकांनी केअर टेकर म्हणून राहत असल्याचे, तसेच कागद-पत्रावरील पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक पालकांचे अर्ज बाद झाले आहेत.
पडताळणीसाठी पालक उन्हात ताटकळत
पडताळणीसाठी टोकन मिळवण्यासाठी आणि कागदपत्रे तपासण्यासाठी पालकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. सावली किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. महापौर रवि लांडगे यांनी मंडप टाकण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात मंडप टाकलेला नाही.
आरटीई प्रवेशासाठी काही पालकांच्या उत्पन्नामध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे सीएकडून उत्पन्न तपासले जात आहे. अनेक पालकांनी आपल्या जमा कागदपत्रांत चुकीचे पत्ते नमूद केले आहेत.
विलास पाटील (आरटीई पडताळणी समिती अधिकारी)