

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात शनिवारी (दि. 24) 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तीव उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने तसेच, पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहराला तसेच, इतर भागांना पावसाळ्यापर्यंत म्हणजे जूनअखेरपर्यंत पुरेल इतका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणातून 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून दररोज 520 एमएलडी पाणी उचलले जाते. पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी संपूर्ण शहराला पुरवले जाते. एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी घेऊन शहरातील काही भागास पुरवले जाते. आंद्रा धरण पाणी योजनेअंतर्गत निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज 90 एमएलडी पाणी उचलून चिलखी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्या परिसरात पुरवले जात आहे. संपूर्ण शहराला गेल्या साडेसहा वर्षांपासून दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
तीव उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने, पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात शनिवारी (दि.24) 39 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी, काही नगरपालिका व ग््राामपंचयातीला पाणी दिले जाते. धरणातील तो पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला पावसाळ्यासुरू होईपर्यंत म्हणजे जून महिन्यापर्यंत पुरेल इतका आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंद्रा धरणात 46 टक्के जलसाठा
मावळ तालुक्यातील आंद्रा धरणात सध्या 46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आंद्रा पाणी योजनेतून महापलिकेकडून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज 90 एमएलडी पाणी उचलले जाते. ते पाणी अधिक दूषित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिकेस पाणी शुद्धीकरणावर अधिकचा खर्च करावा लागत आहे. तर, भामा आसखेड धरणात 52 टक्के पाणीसाठा पातळी आहे. अद्याप, भामा आसखेड पाणी योजना प्रकल्प पूर्ण न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर 167 एमएलडी पाण्यापासून वंचित आहे. शहराजवळच्या मुळशी धरणात 36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या धरणाचे पाणी मुळा नदीस सोडले जाते.
पिण्याचा पाण्याचा काटकसरीने वापर करावा
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची नासाडी करू नये. पाण्याची गळती होऊ नये यासाठी नादुरुस्त तोट्या, नळजोड दुरुस्त करून घ्यावेत. आवार, अंगण, रस्ते, जिने तसेच, वाहन धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये. शिल्लक पाणी शिळे म्हणून फेकून देऊ नये. पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.