

पिंपरी: उन्हाच्या झळा तीव होऊ लागल्याने शनिवार (दि. 25) शहर परिसराचा तापमानाचा पारा 41 अंशावर पोचला. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद या वेळी झाली आहे. वाढत्या झळांमुळे शहरवासीय पुरते हैराण झाले आहेत.
आधीच उकाड्याने हैराण नागरिक उष्णतेची लाट ओसरण्याची वाट पाहत आहेत. सकाळी नऊ वाजताच उन्हाच्या काहिलीने नकोसे वाटत आहे. दहानंतर कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. नागरिकदेखील दुपारी कामे करणे शक्यतो टाळत आहेत.
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. तापमान 38 ते 40 अंशाच्या दरम्यान असल्याने दुकानचालकदेखील उकाड्याने दुपारी दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. शनिवारी तापमानाने उच्चांक गाठला. दिवसभर घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करणारे नागरिक थंडावा मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
घरातील व कार्यालयातील वातानुकुलित यंत्रणेचा जलद गतीने वापर सुरू झाला आहे. पंख्याने मिळणारी हवादेखील नकोशी वाटत आहे. कुलर, एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळी आणि रात्रीदेखील दमट वातावरण आहे. कशानेच गारवा मिळत नसल्याने नागरिकांना उन्हाळा नकोसा वाटू लागला आहे.
गोरगरीब नागरिक थंडावा मिळविण्यासाठी झाडाखाली, मंदिरात किंवा इमारतीच्या सावलीचा आधार घेत आहेत. भर दुपारी रस्त्याची कामे करणारे, खोदकाम करणारे आणि इतर कष्टकरी यांचे उन्हामुळे हाल होत आहेत. सोशल मीडियावरूनदेखील उन्हापासून काय काळजी घ्यावी, याबाबत मेसेज फिरत आहेत.