Pimpri RPI Leader: मोशी टोलनाका परिसरात आरपीआय पदाधिकाऱ्याची हॉटेलमध्ये चाकूने हत्या

जुन्या वादातून घडल्याचा संशय; नितीन धोत्रेचे नाव समोर, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
knife attack
knife attackPudhari
Published on
Updated on

पिंपरी: आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे.

knife attack
PCMC Standing Committee Decisions: पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे महत्त्वाचे निर्णय; संरक्षण विभाग करारास मंजुरी

अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (४६, रा. कुरुळी, खेड) असे खून करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे (४३, रा. कुरळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. ते मयत अनिल गोळे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गोळे हे पुणे ग्रामीण परिसरात रिअल इस्टेट व्यवसाय करत होते. तसेच ते आरपीआय पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते. महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या कार्य अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.

knife attack
Maharashtra AI Drone Sugarcane Farming: ऊस शेतीत एआय ड्रोनचा वापर; उत्पादनात 35-40% वाढीचा अंदाज

दरम्यान, बुधवारी चालक नागनाथ चाटे हे वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे अनिल गोळे हे स्वतः त्यांच्या फॉरच्यूनर कारमधून फिरत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास वैभव रोकडे यांनी चाटे यांना फोन करून युवराज गार्डन हॉटेल येथे काहीतरी गंभीर प्रकार झाल्याचे सांगितले. त्यानंतर चाटे घटनास्थळी पोहोचले असता, अनिल गोळे हे हॉटेलमधील कॅश काऊंटरसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

knife attack
Sunil Shelke Political Controversy: मावळमध्ये राजकीय खळबळ; रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना गोळे यांनी चालकाला सांगितले की, काही दिवसांपूर्वी नितीन धोत्रे याच्यासोबत जुन्या कारणावरून त्यांचा वाद झाला होता. त्यावेळी धोत्रे याने “तु माझ्या नादी लागू नको, तुला फार जड जाईल,” अशी धमकी दिली होती. तसेच “नितीन धोत्रे यांच्या सांगण्यावरून दोन अज्ञात मारेकऱ्यांनी माझ्यावर चाकूने हल्ला केला,” असेही त्यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

knife attack
Sangvi Electricity Problem: सांगवीत वीजपुरवठा संकट; जुन्या केबल्स बदलण्याची मागणी

दरम्यान, या हत्येमागे जुगार अड्ड्यावरील कारवाईचा राग कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नितीन धोत्रे याचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मोठा जुगार क्लब सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्या क्लबवर धाड टाकून कारवाई केली होती. ही कारवाई अनिल गोळे यांच्या सांगण्यावरूनच झाली असल्याचा संशय धोत्रे याला होता. त्यातूनच दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता, अशी चर्चा सुरू आहे.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अनिल गोळे यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. तसेच नाकावर आणि डाव्या गुडघ्यावरही वार करण्यात आले आहेत. उपचारादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news