

पिंपरी: तुम्ही आमच्या विरोधात निवडणुकीला उभे राहण्याचे धाडस केलेच कसे, तुम्हाला जीवे मरतो असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका कुदळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ११) रात्री सव्वाबारा वाजता पिंपरी गावात घडली. या हल्ल्यामुळे शहरातील वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे.
पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, स्वप्निल वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे (सर्व रा. नवमहाराष्ट्र स्कूल, रंगनाथ कुदळे पडाळ क्रमांक १, पिंपरी गाव) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका कुदळे या प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत. पिंपरी गाव येथे फिर्यादी यांचे दोन मजली घरी असून त्यांचे सर्व कुटुंब तेथेच राहते.
सोमवारी मध्यरात्री घरच्या बाहेर मोठमोठ्याने आवाज येत असल्याने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पहिल्या मजल्यावरून जिन्याने खाली येत असताना आरोपींनी घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस का केले, तुम्हाला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या सासूबाईंना धक्का देऊन खाली पाडले. फिर्यादी यांचा चुलत दीर भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी करण्यात आले.
त्यानंतर आरोपींनी घरासमोरील पाण्याचे जार रस्त्यावर तसेच आसपासच्या घरावर फेकले. बाहेर जमलेल्या नागरिकांवर जार फेकत त्यांनी दहशत माजवली. घरासमोरील दुचाकी पडल्या. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांना फोन केला असता आरोपी पळून गेले. तपास पिंपरी पोलिस करत आहेत.