

पिंपरी: पीएमपी बससेवेला प्रवाशांची नेहमी मोठी गर्दी असते. वाढत्या गर्दीचा फायदा फुकट्या प्रवाशांकडून घेतला जात असून, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाच्या तिकीट तपासणी पथकामार्फत वॉच ठेवत एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 1 कोटी 10 लाख 95 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा पुणे, पिंपरी चिंचवड आणि शहरातील पीएमआरडीए हद्दीतील 380 मार्गांवर पीएमपीच्या बसगाड्या प्रवाशांना सेवा देतात. दिवसभरात पीएमपीच्या 1700 बस विविध मार्गांवर धावतात. माफक दरात होणारा प्रवास अनेकांना परवडत असल्यामुळे नोकरदार महिला, पुरुष, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येेष्ठ नागरिक यांची प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी होते. वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत पीएमपीने सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गतवर्षीच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 1 कोटी 10 लाख 95 हजार 500 ऐवढी दंडाची रक्कम फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे. या दंडाच्या रकमामुळे पीएमपीच्या महसुलात वाढ झाली आहे. पीएमपी प्रशासन वतीने नेमण्यात आलेल्या पथकांकडून विविध मार्गांवरील बसगाड्यांमधून तिकिटाची तपासणी केली जाते. विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्वरित दंड आकारण्यात येतो.
दंडाची रक्क्कम 50 ते 500 रुपये
पीएमपीच्या बसगाडयामध्ये वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशावेळेस तिकीट तपासणी पथकाने बसमध्ये जाऊन तपासणी केल्यास हे फुटके पकडले जातात. विनातिकीट प्रवासी सापडल्यानतंर 50 ते 500 रुपयापर्यंत दंड आकारला जातो.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत तिकीट तपासणी केले जाते. तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे दंड वसूल केला जातो.
यंशवत हिंगे वाहतूक व्यवस्थापक, पुणे
ऑनलाइन दंड आकारणी
दिवसभरात आठ पथकांमार्फत तिकीट तपासणी केली जाते. यापूर्वी दंडाची रक्कम रोखीने अथवा तिकीट तपासणीस स्वतःच्या यूपीआय, क्यूआरकोडवर घेत होते. यामुळे अनेकवेळा वादावदीचे प्रसंग घडत होते. आता तिकीट तपासणीस यांना दंड आकारणीसाठी प्रत्येकी पथकास एक मशीन देण्यात आले आहे. या तिकीट मशीनवर तपासनीस दंडाची रक्कम ऑनलाइन घेऊ शकतात.