

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन ते निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदानापर्यंत व्हिंटेज कार रॅली रविवार (दि. 11) काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.
रॅलीतील सन 1935 पासूनच्या विविध प्रकारच्या आकर्षक गाड्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये फोर्ड, 1950 ते 2000 मधील मिली सिटॉप, मर्सिडिज,पीमियर पद्मिनी, 118 एनई,सिलेक्ट, प्रेसिडेंट तसेच, दुसर्या महायुद्धातील जीप, लॅब्रेटा, विजया सुपर, राजदूत, येझदी, व्हेस्पा, बजाज सुपर अशा दुचाकींसह आदी गाड्यांचाही समावेश होता.
रॅलीत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अभिनेत्री श्रेया बुगडे, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्लासिक कार क्लबचे अध्यक्ष अनंत भुकेले पाटील व कर्मचारी सहभागी झाले होते.
मतदारांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. फ्लॅश मॉब सादर करण्यात आला.
मतदान केल्यानंतरच सुटीचा आनंद घ्या
लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. गुरुवार (दि. 15) राज्य शासनाने निवडणुकीसाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्या दिवशी सर्वप्रथम सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. आपले मतदान ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी केले.