

पिंपरी: महापालिका निवडणुकीत यंदा तब्बल 317 महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक रिंगणात एकूण 691 उमेदवार आहेत. त्यात भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांनी 62 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर, सर्वात कमी महिलांची संख्या असलेला पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बहुजन समाज पार्टी आहे. तर, अपक्षांमध्येही 64 महिलांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50 टक्के महिला आरक्षण असल्याने 128 पैकी 64 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे 64 महिला नगरसेवक या पालिका सभागृहात आपआपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतील; मात्र यंदा खुल्या जागेसाठी सहा महिला निवडणूक लढत असल्याने यंदा ही लढत रंतगदार ठरणार आहे.
प्रभाग आरक्षणानंतर अनेक प्रभागात बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक पुरुषांना तेथे आपल्या घरातील आई, बहीण अथवा पत्नीला उमेदवारीसाठी पक्षाकडे साकडे घालावे लागले होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी अपक्ष म्हणूनदेखील महिलांना उमदेवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यापैकी काही प्रभागात या अपक्ष पॅनल म्हणूनदेखील तयारी सुरू केली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून तीन उमेदवारांचे एबी फॉर्म उशिरा पोचल्याने ते अपक्ष लढत आहेत. त्यामध्ये दोन महिला आहेत. तसेच, एका खुल्या जागेवर महिला उमेदवारास संधी देण्यात आल्याने सर्वाधिक महिलांची संख्या ही भाजपमध्ये आहेत.
त्यानंतर राष्ट्रवादीकडूनदेखील एका ठिकाणी खुल्या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा महिला विरोधात महिलाच नव्हे, तर अनेक ठिकाणी महिला विरोधात पुरुष उमेदवारदेखील लढत पहायाला मिळणार आहे.