

पिंपरी: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे महिलांसाठी जिव्हाळ्यांचा असणारा घटक म्हणजे गॅस सिलिंडर. त्याचे दर वाढले असून टंचाईदेखील आहे. त्यामुळे महिलांचे बजेट तर कोलमडलेच आहे. मात्र, गॅस सिलिंडर वेळेत मिळाला नाही, तर पर्याय काय? असा प्रश्न महिलांच्या समोर आहे. गृहिणी असो वा नोकरदार महिला सर्वांनाच आता गॅस टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गॅस सिलिंडर वेळेत न मिळाल्यास घाइ-गडबडीच्यावेळी सर्वच वेळापत्रक कोलमडते. गृहिणी आणि नोकरदार महिलांना सकाळी मुलांचे डबे वेळेत तयार करणे तसेच दुपारचा स्वयंपाक अशी सर्व कामे गॅसमुळे सोपी होतात. सिलिंडर बुक केल्यानंतर 21 दिवसांचा कालावधी आता 30 दिवसांचा केला आहे. सध्या तर वितरक एजन्सी गॅस बुकिंगदेखील करून घेत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अमेरिका, इस्त्रायल व इराण यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मी नोकरदार महिला असल्यामुळे संध्याकाळी कधी गॅस येईल, कधी युद्ध संपेल असे सांगता येत नाही. मी दहा दिवसांपूर्वी गॅस आणला आहे. पण कुटुंब मोठे असल्यामुळे 25 दिवस पुरेल एवढा गॅस सिलिंंडर नाही, शिवाय हॉटेलला पण गॅस मिळणार नाही, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतील. केंद्राने अत्यावश्यक सेवा कायदा लागू केल्यामुळे आणखीनच अडचण निर्माण झाली आहे
संगीता जोगदंड (बँक कर्मचारी)
मी आयटीमध्ये जॉब करते. मला हॉटेलमध्ये जेवणाची सवय आहे. पण आता विचार करावा लागेल; कारण हॉटेल व्यवसायाकडे गॅस सिलिंडर नसणार आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे थोडाफार शिल्लक आहे ते चढ्या दराने जेवण देतील. वस्तूंचे दर वाढतील त्यामुळे ते परवडणारे नाही. हा एक दिवसाचा प्रश्न नाही. युद्ध कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आमचे महिन्याभराचे बजेट कोलमडून जाईल.
ऋतुजा चव्हाण
सर्व गॅस एजन्सी पण आता सिलिंडर लवकर देणार नाहीत किंवा चढ्या दराने देतील. आम्ही स्वयंपाक कसा करणार आणि खाणार काय? सिलिंडर आणणार कुठून? फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे चुलीवर पण स्वयंपाक करता येणार नाही
मीना करंजवणे
पूर्वी सिलिंडर न मिळाल्यास काही दिवस स्टोव्हवर स्वयंपाक करायचो. पण आता रॉकेल तरी कुठे उपलब्ध आहे. गॅसला इंडक्शन स्टोव्ह पर्याय आहे. पण वीजबिल परवडणार नाही. शहरात राहत असल्याने चूलही मांडू शकत नाही.
सुनीता देशमुख
सिलिंडरवाचून कुठलेही घरातले काम होणार नाही. उपाशी राहायची वेळ येईल. मला चूल पेटवता येणार नाही; कारण पुरेशी जागा नाही. या गोष्टीचा सर्वसामान्यांवर परिणाम होईल. गरिबांना उपाशी राहायची वेळ येईल
वैशाली अवताडे