Pimple Gurav Garbage Dumping: पिंपळे गुरवमध्ये नदीकाठावर कचऱ्याचे डोंगर; डुकरांचा सुळसुळाट, हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

मोशी डेपो बंद असल्याने महिनाभरापासून कचरा संकलन; चिखल, दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त
Garbage Dumping
Garbage DumpingPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेला महिना उलटून गेला तरी महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचा सावळागोंधळ सुरूच आहे. पिंपळे गुरव येथील काशीद पार्क भागात, 'ड' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग २९ मध्ये महापालिकेचा आरोग्य विभाग नदीकिनाऱ्यावर बेकायदेशीरपणे कचरा संकलन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभाग नक्की कुणाच्या सांगण्यावरून लोकवस्तीजवळ कचरा गोळा करत आहे? आणि स्मार्ट सिटीच्या हद्दीत पशुवैद्यकीय अधिकारी नदीकिनाऱ्यावर डुक्कर पालनाला परवानगी कशी काय देत आहेत? असे संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Garbage Dumping
Pavanagar Dudhiware Ghat: पवनानगरच्या दुधीवरे खिंडीत अचानक दगड कोसळला; कारचे नुकसान, प्रवाशांचा जीव टांगणीला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील काशीद पार्क परिसरातील नदीकिनाऱ्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकला आहे. सद्यस्थितीत येथे कचऱ्याचे अवाढव्य ढिगारे साचले आहेत. महापालिकेने कचरा गोळा केलेल्या या भागात आता धिप्पाड डुकरांचे मोठे साम्राज्य पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विकसित परिसरात महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी या डुक्कर पालनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, की त्यांना या गंभीर परिस्थितीची माहितीच नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या डुकरांमुळे परिसरात घाण आणि आजारपण पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्या या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, हा कचरा व डुकरे तात्काळ न हटवल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

Garbage Dumping
Dehu Road Accident Hotspot: देहूरोडचा देहू फाटा ठरतोय ‘डेथ स्पॉट’; वारंवार अपघातांमुळे नागरिक संतप्त

धरणातून विसर्ग; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ?

गेल्या दोन आठवड्यांत पवना धरण ९८ टक्के भरल्यामुळे धरणातून नदीपात्रात सतत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. अशा वेळी प्रशासनाकडून नदीकिनाऱ्यावरील जनावरे, नागरिक आणि वाहने तात्काळ हटवण्याचे आदेश दिले जातात. मात्र, एकीकडे महापूर आणि पाण्याच्या वाढत्या पातळीचा धोका असताना, दुसरीकडे नदीकिनाऱ्यावरच कचऱ्याचे ढिगारे आणि डुकरांचा वावर वाढला आहे. पूरपरिस्थितीत येथे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा जनावरे वाहून गेल्यास याची जबाबदारी पशुवैद्यकीय अधिकारी घेणार आहेत का, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Garbage Dumping
Pimpri Chinchwad Street Light Safety: पिंपरी-चिंचवडमध्ये विद्युत दिव्यांच्या दुरुस्तीवेळी सुरक्षेचा फज्जा; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

चिखल, दुर्गंधीमुळे नागरिक हवालदिल

गेल्या महिनाभरापासून महापालिकेचे जेसीबी, कॉम्पॅक्टर आणि डंपर यांसारख्या अवजड वाहनांची या भागात सतत ये-जा सुरू आहे. यामुळे परिसरातील रस्ते चिखलमय झाले असून, त्यावर जागोजागी कचरा सांडत आहे. प्रभागातील कचरा येथे आणताना आणि इथून पुन्हा भरून नेताना वाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटत आहे. या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक रहिवाशांना घरामध्ये राहणेही असह्य झाले आहे.

अनाथ आश्रम, सोसायट्या धोक्यात

विशेष म्हणजे, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून आणि डुकरांच्या सुळसुळाटापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर उच्चभ्रू सोसायट्या, मोठ्या इमारती, व्यावसायिकांचे गाळे आणि मुलांचा अनाथ आश्रम आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे येथील पारिजात कॉलनी, सुवर्णयुग कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, तारा सोफेश सेंटर, सिद्धेश्वर पार्क आणि निसर्ग कॉलनी या परिसरातील हजारो रहिवाशांचे, विशेषतः अनाथ आश्रमातील लहान मुलांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे.

Garbage Dumping
Missing Link Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात तुषार भूमकरचा दुर्दैवी अंत; ११ महिन्यांच्या आर्यवीरसह दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले

मोशी येथील डंपिंग बंद झाल्याने महिनाभरापूर्वी ही जागा शोधली. या वेळी प्रभाग २९ मधील संपूर्ण कचरा संकलित करून येथे आणण्यात आला आहे. तसेच रोजच्या रोज येथील संकलित केलेला कचरा डंपरच्या सहाय्याने पुन्हा मोशी येथील डेपोमध्ये पाठवत आहोत. पावसाने उसंत घेतली तर येत्या दोन ते तीन आठवड्यांपर्यंत येथील संकलन केलेला कचरा हटविला जाईल.

रश्मी तुंडलवार, आरोग्य निरीक्षक, पिंपरी-चिंचवड मनपा.

येथील परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे. डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे येथील परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे

श्रीकृष्ण फिरके, ज्येष्ठ नागरिक

या परिसरात उच्चभ्रू सोसायट्या असूनदेखील मोठ्या प्रमाणात कचरा संकलन करून नागरिकांच्या आरोग्याशी आरोग्य विभाग खेळ खेळत आहे.

अनिल पाटील, सेक्रेटरी, खुशबू सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news