

बजरंग मासाळ
पिंपरी: शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले छोटे बोगदे, समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) आणि अंडरपास सुरक्षितेच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. शहरातील विविध समतल विलगकांची पाहणी करताना अनेक ठिकाणी विद्युत दिवे बंद, भिंतींना तडे, खोल खड्डे, तुटलेले काँक्रीट, लटकणारे लोखंडी भाग, फाटलेले जाहिरात फलक आणि घसरडे झालेले रस्ते दिसून आले. अनेक ठिकाणी बोगद्यांमध्येच तीव्र वळण असल्याने अपघातांची शक्यता अधिक गंभीर बनली आहे.
भिंतींना तडे, छताचे तुकडे लटकलेले
अनेक समतल विलगकांच्या भिंतींना मोठे तडे गेलेले दिसून आले आहेत. काही ठिकाणी उंच वाहनांच्या धडकेमुळे छताचे काँक्रीट तुटून लोखंडी सळ्या व सिमेंटचे तुकडे बाहेर आले आहेत. धोकादायक अवस्थेत हे भाग तसेच लटकत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अनेक ठिकाणी धोकादायक वळणे
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या समतल विलगकांची अवस्था पाहता प्रशासनाकडून देखभाल आणि सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. काही बोगद्यांमध्ये महामार्गालगतच्या उद्यानांचे पाणी थेट रस्त्यावर वाहत येत असल्याने संपूर्ण मार्ग चिखलमय व घसरडा झाला आहे. तसेच, समतल विलकांच्या ठिकाणी मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. दुचाकी घसरण्याच्या घटनादेखील वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक समतल विलगकांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक उंच वाहन घुसल्याने छताचे भाग तुटलेले असून, ते धोकादायक अवस्थेत लटकताना दिसत आहेत. हे तुटलेले काँक्रीट किंवा लोखंडी भाग कधीही वाहनांवर कोसळू शकतात. तरीदेखील संबंधित विभागाने ते हटवण्याची कोणतीही तातडीची उपाययोजना केलेली दिसत नाही.
अंधारात जीव धोक्यात
अनेक बोगद्यांमधील विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. दिवसाबाहेरील तीव्र प्रकाशातून अचानक काळोख्या बोगद्यात प्रवेश करताना चालकांचा अंदाज चुकतो. विशेषतः दुचाकीस्वारांना काही क्षण रस्ता दिसेनासा होतो. त्यातच बोगद्यांत वळण असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही.
खड्डे अन् घसरडे रस्ते
काही समतल विलगकांमध्ये मोठे खड्डे पडले असून, दुरुस्तीऐवजी तात्पुरते बॅरिकेड्स टाकून प्रशासनाने जबाबदारी झटकली आहे. अनेक ठिकाणी हेच बॅरिकेड्स रस्त्यावर पडून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. उद्यानातील पाण्याचा व स्ट्रॉम वाटर लाइनचा प्रवाह थेट बोगद्यांत येत असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत.
उपाययोजना
सर्व समतल विलगक व बोगद्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे
बंद पडलेले विद्युत दिवे त्वरित करावेत
खड्डे तातडीने बुजवावेत
घसरडे झालेले मार्ग स्वच्छ करावेत
ड्रेनेज व्यवस्था सुधारावी
बोगद्यांत पडलेले बॅरिकेड्स, राडारोडा हटवावा
तुटलेले काँक्रीट, लोखंडी सळया व लटकणारे भाग सुरक्षितपणे काढावेत
उंचीपेक्षा मोठ्या वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी हाइट गेजव सेन्सर यंत्रणा बसवावी
प्रत्येक समतल विलगकात रिफ्लेक्टर, कॅट आय आणि चेतावणी फलक बसवावेत
फाटलेले जाहिरात फलक व धोकादायक बॅनर तातडीने हटवावेत
अपघातप्रवण बोगद्यांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत
नियमित देखभालीसाठी संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करावी
नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन व तक्रार निवारण प्रणाली सुरू करावा
आम्ही विभागीय अधिकारी व कर्मचारींना सूचना दिल्या आहेत. विभागीय कर्मचारी तात्काळ जिथे दिवे नाहीत, तिथे दिवे व वायरचे काम करुन घेत आहेत. दिवे व वायर्स वेळोवेळी बदलूनदेखील त्याची चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांमध्ये तक्रारदेखील नोंदवली आहे. आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वारंवार देखभाल करत आहोतच. नागरिकांनी सहकार्य करावे.
माणिक चव्हाण, सह शहर अभियंता विद्युत विभाग
शहरातील सर्व बोगदे व समतल विलगकांचे स्ट्रक्चरल ॲाडिट झाले आहे. ज्या फ्लायओव्हर व ब्रिजचे आयुर्मान 20 वर्षांपासून जास्त आहे, त्यांचा ॲाडिट अहवाल या आठवड्यात येणार आहे. त्यानुसार येत्या 15 जूनपर्यंत कामे होतील. जे धोकादायक तुकडे व भिंतीच्या प्लास्टरचा भाग फुगलेला आहे, त्यावर तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतील.
विजय भोजणे, उप अभियंता, प्रकल्प स्थापत्य विभाग, महापालिका