

मोशी: चिखली, मोशी, स्पाइन रोड परिसरात गेल्या काही दिवसांत विनापरवाना खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या परिसरात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपासून ते पाण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा दर्जा कमालीचा खालावला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मुले घराबाहेर पडत आहेत, ज्यामुळे रस्त्यावरील आणि बागेसमोरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. मात्र, या विक्रेत्यांकडे अन्नसुरक्षा विभागाचा परवानाच नसेल, तर प्रशासन त्यांच्यावर नेमकी काय आणि कशी कारवाई करणार, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक स्वतंत्र पथक नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. असे पथक तयार झाल्यास प्रत्येक विक्रेत्याकडील परवान्याची आणि त्यांच्या खाद्यपदार्थांच्या दर्जाची सखोल तपासणी करणे शक्य होईल. आज राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले जात असताना, या परिसरात मात्र अशा घातक पदार्थांचा सर्रास वापर करून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. भविष्यात जर एखाद्या नागरिकाला किंवा लहान मुलाला या दूषित अन्नामुळे जीवघेणा त्रास झाला, तर याला जबाबदार कोण, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल. त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा घटकांवर तातडीने चाप बसवणे आवश्यक आहे.
कायद्याकडे विक्रेत्यांचे दुर्लक्ष
या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाची बाजू समजून घेतली असता, विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कायदेशीर तरतूद आहे. हा अन्न सुरक्षा परवाना ऑनलाइन पद्धतीने अत्यंत सोप्या प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून दिला जातो, तसेच घरगुती स्तरावर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठीही तो बंधनकारक करण्यात आला आहे. कायदा अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी कठोरपणे होणे गरजेचे आहे. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता या परिसरात तातडीने कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परवाना मिळवणे अत्यंत सोपे आहे. विनापरवाना व्यवसाय करताना आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे. आगामी काळात विनापरवाना विक्रेत्यांविरोधात मोहीम तीव केली जाणार असून, परवाना न घेणाऱ्या व्यावसायिकांवर मोठा दंड भरण्याची नामुष्की ओढवू शकते
दिगंबर भोगावडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
खाद्यपदार्थ विक्रेते, खानावळ चालवणाऱ्या भगिनी तसेच खाद्यपदार्थांशी संबंधित लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या सर्वांना आवाहन आहे की, त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय करावा. व्यावसायिक परवान्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून संभाव्य दंडात्मक कारवाई टाळावी.
कविता आल्हाट, महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष