

नवलाख उंबरे: अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. एसएससी निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन आता महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांची तपासणी करायला सुरुवात केली आहे.
यासाठी अनेक विद्यार्थी व पालकांनी आपल्या जवळच्या इंटरनेट सेंटर आणि महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीकृत प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या यादीत आपले नाव यावे यासाठी धडपड सुरू आहे.
पहिली फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये कोणते महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या चांगले, निकालाची परंपरा, सुविधा तसेच अभ्यासाचे वातावरण उत्तम आहे.
याची कसून तपासणी विद्यार्थी आणि पालक करताना दिसत आहेत. अनेक विद्यार्थी विविध महाविद्यालयांची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट देत असून, मागील वर्षांच्या निकालांचा आणि उपलब्ध शाखांचा अभ्यासही करत आहेत.
पालकांनी शिक्षण विभागाकडून अधिक माहिती वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, तसेच फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सुलभता यावी, अशी मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयांच्या मदत केंद्रांमध्ये मार्गदर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशप्रक्रियेत स्पर्धा तीव असणार आहे, असे संकेत मिळत आहेत.