

पिंपरी: महापालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले.
अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी, भोसरीतील कुंदननगर तसेच शहरातील अन्य पूरग्रस्त अशा सुमारे २० ते २५ भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने सुमारे १ हजार ५०० नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.
चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे यशस्वी बचावकार्य करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांमध्ये वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेल्या पुजाऱ्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. ताथवडे परिसरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात हलविण्यात आले. काळेवाडी येथे गर्भवती महिला, लहान मुले, अनेक वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. जुनी सांगवी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आई आणि तिच्या बाळाची धाडसीपणे सुखरूप सुटका करण्यात आली.
पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या सुमारे ५ हजार नागरिकांना महापालिकेच्या शाळांमधील निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या गाई, म्हशी आदी सुमारे ७५० जनावरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या बचाव मोहिमेत उपअग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने तसेच फायरमन सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर आणि इतर अग्निशमन जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास ७ दिवस सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.