Dehu Palkhi Sohala 2026: इंद्रायणीच्या साक्षीने भक्तीचा महासागर! पावसातही देहूनगरीत विठ्ठलनामाचा अखंड गजर

दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी, चिमुकले विठ्ठल-रखुमाई, ३० वर्षांची अखंड वारी आणि सेवाभावाने उजळलेली देहूनगरी
Dehu Palkhi Sohala 2026
Dehu Palkhi Sohala 2026Pudhari
Published on
Updated on

दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीच्या साक्षीने आठवणींचा ठेवा

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे रूप वारकऱ्यांना विशेष आकर्षित करत आहे. नदीच्या काठावर थांबून अनेक वारकरी आपल्या मित्र, नातेवाईक आणि दिंडीतील सहकाऱ्यांसोबत छायाचित्रे टिपताना दिसत आहेत. हिरवागार परिसर, पावसाच्या सरी आणि खळाळत वाहणारी इंद्रायणी यांच्या सान्निध्यात वारीतील अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची प्रत्येकाची धडपड सुरू आहे. भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ अनुभवत वारकरी या आठवणी कायमस्वरूपी जतन करत असल्याचे चित्र देहूनगरीत पाहायला मिळत आहे.

चिमुकले बनले विठ्ठल-रखुमाई

पालखी सोहळ्यात सिद्धी काजळे आणि गाथा मोरे लहान मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. हिरवी काठपदराची साडी, गळ्यात सोन्याचा दागिना, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर कुंकू. पारंपरिक वेशात गाथा मोरे आणि पांढरा कुर्ता-पायजमा, गुलाबी आणि सोनेरी किनार असलेली कफनी, डोक्यावर पांढरी टोपी. गळ्यात तुळशीच्या माळ घालून या चिमुकल्यांनी भाविक आणि वारकऱ्यांचे लक्ष वेधले. वारीची परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत आहे. देवगावच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले हे चिमुकले वारकरी रुक्मिणी-विठ्ठलाच्या वेशात लक्षवेधी ठरले.

फुगडी खेळताना महिला वारकरी

वारकरी देहूनगरीत आले की, भक्तीरसात देहभान हरपून जातात. संसारातील सुख-दु:खांचा त्यांना विसर पडतो. आपल्या सहकाऱ्यांसमवेत वारीत सहभागी होऊन ते फुगडी झाल्यावर फुगडीचा फेर धरून आनंद व्यक्त करताना दोन महिला वारकरी.

३० वर्षांची अविरत वारी; शेती आणि ड्रायव्हिंग सांभाळत इंदापूरचे 'व्यवहारे दांपत्य' विठ्ठलचरणी लीन हातात टाळ-चिपळ्या, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठलाचे नाव... इंदापूरचे वैशाली आणि शरद मधुकर व्यवहारे हे दांपत्य मंगळवारी (दि.७) देहूगावात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ३० वर्षांच्या अखंड भक्तीचा आनंद स्पष्ट झळकत होता. इंद्रायणीचा पूर आणि कोसळणारा पाऊसही त्यांच्या श्रद्धेपुढं फिका पडला.

​गेल्या तीन दशकांपासून हे दांपत्य संसार आणि वारीचा गाडा तितक्याच निष्ठेने हाकत आहेत. वर्षभर गावाकडे शेती करायची आणि सोबतीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शरदराव चालक (ड्रायव्हर) म्हणून व्यवसाय सांभाळतात. मात्र, आषाढीची चाहूल लागताच हे दोघेही सर्व कामे बाजूला सारून विठुमाऊलीच्या ओढीने घराबाहेर पडतात. फक्त प्रस्थान सोहळ्यापुरते मर्यादित न राहता, देहूपासून थेट पंढरपूरपर्यंत पायी चालत जात माऊलीची सेवा करण्याची त्यांची ही गेल्या ३० वर्षांची अविरत परंपरा आहे.

​वर्षभर संसाराची आणि रोजगाराची चाके कितीही फिरवली, तरी पंढरीची पाऊलवाट चालल्याशिवाय आमच्या मनाला सुख मिळत नाही, अशी भावना या दांपत्याने व्यक्त केली. संसाराच्या चक्रातून वेळ काढत भक्तीचा हा ३० वर्षांचा अखंड प्रवास इतर वारकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरतो.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

विविध संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह तपासणी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे मोफत वाटप; तसेच उष्माघात, थकवा आणि किरकोळ दुखापतींवर तत्काळ उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि स्वयंसेवक दिवसभर सेवेत कार्यरत होते.

साताऱ्याच्या सुभाष बाबरांची 'विठ्ठलाची ओढ'; १० वर्षांची अखंड सेवा!

इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी... निसर्गाचे हे रौद्र रूपही साताऱ्याच्या आंबेदरे गावच्या सुभाष ज्ञानदेव बाबर यांच्या पावलांना रोखू शकले नाही. गेल्या सलग दहा वर्षांपासून ते साताऱ्याहून मोठ्या श्रद्धेने देहूत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत.

​विठ्ठलभक्तीचा वारसा जपत सुभाषराव 'दिंडी क्रमांक ७३' मध्ये विणेकरी म्हणून आपली सेवा बजावतात. यंदा देहूत पावसाचा जोर आहे, रस्त्यांवर पाणी साचले आहे आणि गर्दीही काहीशी रोडावली आहे. मात्र, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर बुक्का आणि हातात वीणा घेऊन, या पुरातूनही वाट काढत ते मंदिराकडे मार्गस्थ झाले.

​पाऊस कितीही असो वा पूर.. विठ्ठलाची ओढ आम्हाला देहूपर्यंत खेचून आणतेच, असे विणेकरी सुभाष बाबर भावुक होऊन सांगतात. वयाची आणि निसर्गाची सर्व आव्हाने बाजूला सारून, विणेकरी म्हणून दिंडीच्या पुढे चालणारे सुभाषराव हे या वारीतील अखंड श्रद्धेचे उदाहरण आहेत.

चिमुकल्यांचा वाढला उत्साह

पालखी प्रस्थानाचा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांसह अनेक भाविक आपल्या कुटुंबासह दाखल झाले होते. यात चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. भर पावसातही या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर पांडुरंगाच्या भेटीची आणि भक्तीची अनोखी ओढ स्पष्टपणे झळकत असल्याचे या वेळी पाहायला मिळाले.

​कडक पोलिस बंदोबस्त

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूगाव आणि मुख्य मंदिर परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मंदिराच्या १ ते २ किलोमीटर आधीच सर्व वाहने थांबवली होती. पोलिसांचे हे नियोजन अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध होते.

पावसात गाठले मंदिर

निसर्गाच्या आव्हानांवर वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती भारी पडल्याचे चित्र देहूत दिसले. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती आणि देहूतील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जिद्दीने वाट काढत, विठ्ठलनामाचा गजर करत हजारो वारकरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या दिशेने पुढे जात होते.

भक्तीचा वारसा आईच्या कुशीतूनच

वारीची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी जाते. हे या सोहळ्यात पहायला मिळाले. चिमुकलीला वारकरी वेश परिधान केला आहे. हिरवा झब्बा, डोक्यावर काळा फितीचा बॅन्ड, गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळावर गोपिचंदनाचा टिळा. ती हातात छोटा टाळ घेऊन खेळतेय.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी महापालिकेची युद्धपातळीवर तयारी

सततच्या पावसामुळे वारी मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ते खचले असून काही ठिकाणी माती वाहून गेली आहे. वारकऱ्यांची कोणतीही गैरसुविधा होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. खचलेल्या व चिखल झालेल्या ठिकाणी मुरूम टाकून मार्ग सुरक्षित करण्यात येत आहे. वारी मार्गावरील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून, साफसफाई केली जात आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवरही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चहापासून महाप्रसादापर्यंत भक्तिभावाने सेवा

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूनगरीत भक्तिबरोबरच सेवाभावाचेही दर्शन घडले. गावातील विविध सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना, युवक मंडळे तसेच स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला. वारकऱ्यांची खाण्यापिण्याच्या कोणत्याही बाबतीत गैरसोय होऊ नये, तसेच त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेतली जावी, यासाठी ठिकठिकाणी अन्नछत्रे आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात आली होती.

श्वासात श्वास असेपर्यंत वारी

वडिलांची विठुरायाची भक्ती पाहून मीदेखील विठुमाऊलीची भक्ती करायला सुरुवात केली. आज आम्ही सर्व कुटुंबीय विठूरायाच्या प्रेमात आहोत. माझे वय ६५ वर्ष आहे. माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी विठुची वारी करणार आहे. वारीमध्ये आल्यानंतर दुःख कुठे जाते हे कळत नाही, असे जनाबाई थिरडे सांगतात.

नदीकाठी अग्निशामक, एनडीआरएफ यंत्रणा सज्ज

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ आणि सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर देहू परिसरातील नदीकाठावर अग्निशामक दल, एनडीआरएफ पथक, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि प्रशिक्षित लाइफसेव्हर्स तैनात केले होते. धोकादायक ठिकाणी नागरिक व वारकरी जाऊ नयेत, यासाठी सतत गस्त, ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येत होत्या.

बंजारा समाजातील महिलांचा सहभाग

लातूर येथून आलेल्या बंजारा समाजातील सावित्रीबाई पवार आणि पारूबाई पवार या पालखी सोहळ्यात पारंंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या. कपाळावर कुंकू भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक. पावसातही त्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा भाव आणि उत्साह दिसून येत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news