Pimpri Chinchwad Palkhi Traffic: पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज! 2 हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, 45 रस्त्यांवर वाहतुकीत बदल

तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लाखो वारकरी; सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी सर्वंकष नियोजन
Wari
WariPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सहा ते सात लाखांहून अधिक वारकरी आणि भाविक शहरातील पालखी मार्गावरून प्रवास करणार आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय एसआरपीएफ, होमगार्ड, बॉम्बशोधक पथक आणि वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक संवेदनशील ठिकाणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Wari
Lonavala Power Outage: लोणावळा दोन दिवस अंधारात! मुसळधार पावसामुळे शहराचा वीजपुरवठा ठप्प, नागरिकांची मोठी गैरसोय

संत तुकाराम महाराज पालखी ७ जुलै रोजी देहूतून प्रस्थान करून ८ जुलै रोजी आकुर्डी येथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी पिंपरी, कासारवाडी आणि दापोडीमार्गे पुणे शहरात प्रवेश करणार आहे. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ८ जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान करून गांधीवाडा येथे मुक्काम करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ९ जुलै रोजी भोसरी, दिघीमार्गे पुणे शहराच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असल्याने पोलिस प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले आहे.

Wari
Dehu Palkhi Sohala 2026: इंद्रायणीच्या साक्षीने भक्तीचा महासागर! पावसातही देहूनगरीत विठ्ठलनामाचा अखंड गजर

पोलिसांनी पालखी मार्गावरील गर्दीची ठिकाणे निश्चित करून तेथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे नियोजन केले आहे. देहू मंदिर परिसर, इनामदार वाडा, अनगडशहा बाबा, भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी, पिंपरी, कासारवाडी, हॅरिस ब्रिज दापोडी, आळंदी, गांधीवाडा, भोसरी फाटा, दिघी आणि इतर ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याने या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.

यंदाच्या बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तालयातील सर्व यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते पोलिस शिपायांपर्यंत सर्व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, होमगार्ड, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), वाहतूक शाखा, रॅपिड कंट्रोल पथक तसेच विविध प्रकारची वाहने बंदोबस्तात सहभागी असणार आहेत. एकूण आठ वरिष्ठ अधिकारी, १९ सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी, ५२ पोलिस निरीक्षक, २३० उपनिरीक्षक व सहाय्यक अधिकारी, १ हजार ९९९ पोलिस कर्मचारी, ४३५ वाहतूक कर्मचारी, ८०० होमगार्ड, १२ ट्रक, २० जीप आणि इतर वाहने बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.

Wari
Vallabhnagar Underpass Closed: पावसाने बंद पडला वल्लभनगर भुयारी मार्ग; मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बससेवेवर मोठा परिणाम

पालखी मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेवरही विशेष भर देण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी ३२ रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असून, ४३ ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. याशिवाय १८ महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी १३ रस्ते बंद राहणार असून, सात ठिकाणी वाहतुकीचे पर्यायी मार्ग लागू करण्यात येणार आहेत. नऊ महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी गेल्या महिनाभरात विविध स्तरांवर आढावा बैठका घेण्यात आल्या. उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासन तसेच पोलिस आयुक्त यांच्या उपस्थितीत नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय पोलिस आयुक्तांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांवरील अडथळे, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Wari
Sangvi Flood Problem: सांगवीकरांचा संताप! दरवर्षीच्या पुरातून कायमस्वरूपी मुक्तीची मागणी; तात्पुरत्या उपायांना नागरिकांचा नकार

या ठिकाणी सर्वाधिक गर्दीचा अंदाज

पालखी सोहळ्यादरम्यान देहू मंदिर परिसर, इनामदार वाडा, अनगडशहा बाबा, भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर, पिंपरी एच. ए. कॉलनी, कासारवाडी, हॅरिस ब्रिज (दापोडी), आळंदी मंदिर परिसर, गांधीवाडा, भोसरी फाटा आणि दिघी गाव या ठिकाणी सर्वाधिक गर्दी होण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही ठिकाणी तीन ते सहा लाखांपर्यंत भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने या सर्व ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.

  • वरिष्ठ अधिकारी - ०८

  • सहायक आयुक्त - १९

  • पोलिस निरीक्षक - ५२

  • उपनिरीक्षक/सहाय्यक अधिकारी - २३०

  • पोलिस कर्मचारी - १,९९९

  • वाहतूक कर्मचारी - ४३५

  • होमगार्ड - ८००

  • एसआरपीएफ कंपनी - ३

  • बीडीडीएस, एसआरपीएफ - ४

  • ट्रक - १२

  • जीप - २०

  • आरसीपी - ०५

  • विशेष कृती दल - १४

  • संत तुकाराम महाराज पालखी

  • ३२ रस्ते बंद

  • ४३ ठिकाणी वाहतुकीत बदल

  • १८ महत्त्वाचे चौक नियंत्रणाखाली

  • संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

  • १३ रस्ते बंद

  • ७ ठिकाणी वाहतुकीत बदल

  • ९ महत्त्वाच्या चौकांवर विशेष लक्ष

पालखी सोहळा निर्विघ्न, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने सर्वंकष नियोजन केले आहे. सुरक्षा, वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात आले असून भाविकांनी सहकार्य करावे.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news