

पिंपरी: आयसीसी टी-20 क्रिकेट सामन्यावर मोबाइलद्वारे सट्टा घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने छापा टाकला. ही कारवाई रविवार (दि. 1) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील ईश्वरी निवास सोसायटीतील फ्लॅटमध्ये करण्यात आली.
जयकुमार सुरेश धनवानी (36, रा. विश्वशांती कॉलनी नं. 2, पिंपळे सौदागर), साहिल सुरेंद्र मंगवानी (25, रा. साई चौक रोड, पिंपरी), विकी जामनदास लोहाना (34, रा. साई चौक रोड, पिंपरी), विकी लालवाणी, जितू माकीजा आणि निलेश रामरख्यानी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलिस अंमलदार प्रदीप गोरखनाथ मोडांबे (40) यांनी सोमवार (दि. 2) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी मोबाईल कॉलद्वारे सट्टा स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने रविवारी पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीमध्ये छापा घातला. कारवाई दरम्यान पोलिसांनी सात मोबाइल फोन, रोख रक्कम, वही व पेन असा एकूण सहा लाख 57 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बंद खात्याचा चेक देऊन फसवणूक
ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करून बंद बँक खात्याचा चेक देत 6 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 फेब्रुवारी 2026 रोजी बोर्हाडेवाडी, मोशी येथील न्यू गणेश ज्वेलर्स येथे घडला.
सतिश ज्ञानदेव बालसिंगे (45, रा. जय गणेश साम्राज्य चौक, पांजरापोळ समोर, भोसरीगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुलाबसिंग गेनसिंग चौहान (24, रा. इंद्रायणी गार्डन अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) असे फसवणूक झालेल्या सराफाचे नाव असून त्यांनी रविवार (दि. 1) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बालसिंगे याने आपला वाढदिवसाचे कारण सांगत दुकानातून चैन, लॉकेट व हातातील कडे खरेदी केले. त्याबदल्यात आयडीएफसी फर्स्ट बँकेचा 6.79 लाख रुपयांचा चेक दिला. मात्र संबंधित खाते बंद असल्याने चेक वटला नाही.
जावयाने केली सासूला मारहाण
मुलीला भेटण्यासाठी आलेल्या सासूला जावई, त्यांचे वडील आणि एका महिलेने लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा प्रकार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील ठाकरवस्ती परिसरात घडला. अभिषेक भिमराव भोरे (23), भिमराव भोसरे (50) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने रविवार (दि. 1) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या आई त्यांना भेटायला 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ठाकरवस्ती येथील श्रीमान पार्क येथे आल्या. याचा राग आल्याने फिर्यादीचे पती, सासरे आणि एका महिलेने आपसांत संगनमत करून त्यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली.
श्वानाचा अमानुष छळ
श्वानाचा अमानुष छळ करीत त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार (दि. 28) मध्यरात्री घडली. स्वप्नील सखाराम सावंत (रा. राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनासमोर, संत तुकारामनगर, पिंपरी) व त्याचे चार साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या
आरोपींची नावे आहेत. ॲड. प्रज्वल कमलेश दुबे (32, रा. संत तुकारामनगर) यांनी रविवार (दि. 1) संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी एका कुत्र्याला हवेत फिरवून जमिनीवर आपटले तसेच वाहनाने इतर कुत्र्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला.
महिलेला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
गावाकडील जमिनीच्या वादातून एका महिला व तिच्या मुलीला काचेच्या बाटली व दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार (दि. 1) सकाळी साईदत्त कॉलनी, चाकण येथे घडली. गंगूबाई यमनाप्पा कुऱ्हाडे (रा. बलुतअळी, चाकण), हनुमवा बाबू बंडीवडर, रेशमा शंकर बंडीवडर व शंकर बंडीवडर (सर्व रा. कर्नाटक राज्य) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अश्र्िवता हनुमंत कुऱ्हाडे (31, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी सोमवार (दि. 2) याबाबत चाकण उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.