

चऱ्होली: चऱ्होली पंचक्रोशीची जीवनवाहिनी असणाऱ्या चऱ्होलीच्या पुलावरून रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच नागरिकांनी हा पूल वाहतुकीस खुला केला आहे. परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अपघात घडल्यास याला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवजड वाहतूक देखील सुरू झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द या दोन्ही चऱ्होलींना जोडणाऱ्या सरसेनापती खंडेराव दाभाडे पुलाचे काम 20 डिसेंबरपासून सुरू आहे. या पुलावर आजूबाजूचे सर्व जनजीवन अवलंबून आहे. सर्व प्रकारच्या औद्योगिक आस्थापनांमधील वाहतूक देखील याच पुलावरून होत असते. याशिवाय आळंदी हे महाराष्ट्रातील महत्त्वाची तीर्थक्षेत्र असल्यामुळे आळंदीतील वाहतुकीवर ताण पडू नये म्हणून बहुतांश वाहतूक आणि सर्व प्रकारची अवजड वाहतूक चऱ्होलीच्या पुलावरूनच वळविण्यात येते. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी होत होती. या पुलाच्या बेअरिंग्स खराब झाल्या होत्या. या बेरिंग्स बदलण्यासाठीच पुलाचे काम काढण्यात आले होते.
पूल इतके दिवस बंद होता. त्याचप्रमाणे या पुलाच्या चऱ्होली खुर्दकडील रस्ता पीसीएस कंपनीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. आणि पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळेच पुलाच्या बेअरिंग खराब झाल्या होत्या. मात्र आता पुलाचे बेअरिंग्ज बदलल्या असतील तरी खराब झालेला रस्ता आणि खड्डे मात्र कायम आहेत. पुलाचे काम सुरू असल्यामुळे लावण्यात आलेले पत्रे कायम असतानाच वाहनचालकांनी एका बाजूचे पत्रे काढून वाहतुकीला सुरुवात देखील केली. विशेष म्हणजे पोलिस यंत्रणा आणि प्रशासन मूग गिळून गप्प आहे. पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून हस्तक्षेपाची अपेक्षा असताना देखील या दोन्ही यंत्रणांनी हात वर केले. पुलावरील खड्डे आणि चऱ्होली खुर्द हद्दीमधील रस्ता यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र तरीही बेजबाबदारपणाने वाहतुकीला सुरुवात झाली आहे.
पुलावरील खड्ड्यांमुळे बेअरिंग्स पुन्हा खराब होण्याची शक्यता
चऱ्होलीच्या पुलावरील खड्डे कायम आहेत. या पुलावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक होत आहे. मोठमोठे सिमेंट आणि लोखंडी पाईपच्या आणि गॅस भरलेल्या दहा टायरच्या गाड्या या पुलावरून जातात. त्यामुळे बेअरिंग्स आणि एक्सपान्शन जॉईंट पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे पूर्ण काम झाल्यानंतरच पूल सुरू करण्यात यावा, अशी नागरिकांची भावना आहे.
रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असताना वाहनचालकांनी व नागरिकांनी घाई न करता प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाने देखील लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे. म्हणजे नागरिकांची गैरसोय होणार नाही
सचिन तापकीर, नगरसेवक
रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. पुढील दोन-तीन दिवसांनी पुन्हा रस्ता बंद करण्यात येईल. राहिलेले काम पूर्ण करण्यात येईल. नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करावे.
अजय पाटील, अभियंता, पीडब्ल्यूडी विभाग