Kota Car Accident Pimpri Youth: कोटा अपघातात पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू; सहलीवरून परतताना काळाने गाठले

लेह-लदाख ट्रिपनंतर परतीच्या प्रवासात भीषण अपघात; गुढी पाडव्याच्या तोंडावर शहरात शोककळा
Kota Car Accident
Kota Car AccidentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पर्यटनासाठी लेह-लदाख आणि जम्मू-काश्मीर येथे गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांच्या फॉर्च्यूनर कारला राजस्थानातील कोटा येथे दिल्ली-मुंबई महामार्गावर अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. बुधवार (दि. १८) सकाळी केथून पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

Kota Car Accident
Vadgaon Maval Police Investigation: वडगाव मावळ पोलिसांची तत्परता; हरवलेली सोन्याची चैन काही तासांत परत

कुणाल चोरडिया (२५, रा. शांतीबन सोसायटी, चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे पाडाळे) आणि सिद्धेश आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील सुमारे १५ ते १६ तरुणांचा ग्रुप २७ फेब्रुवारी रोजी तीन फॉर्च्यूनर गाड्यांमधून लेह-लदाख आणि जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेला होता. प्रवासादरम्यान ग्रुपमधील गणेश जाचक, प्रसाद आहेर यांच्यासह आणखी एकाची तब्येत बिघडल्याने ते विमानाने माघारी परतले. उर्वरित तरुण प्रवास सुरू ठेवून परतीच्या मार्गावर होते.

Kota Car Accident
Pimpri Construction Damage Footpaths: पिंपरीत बांधकामांमुळे पदपथ व सायकल ट्रॅक उद्ध्वस्त; नागरिक संतप्त

दरम्यान, कोटा शहराजवळील दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. फॉर्च्यूनर कार क्र (एमएच 14 एमओ 9331) वरील अचानक नियंत्रण सुटून छोट्या पुलावरून खाली कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमध्ये अडकलेल्या मयुरेश, सिद्धांत आणि कुणाल यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनातील मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. तिघांंचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहेत. गुरुवार (दि. 19) सकाळी मृतदेह पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Kota Car Accident
Pimpri LPG Shortage: पिंपरीत एलपीजी गॅसचा तुटवडा; इंडक्शन स्टोव्हला वाढती मागणी

मृतांपैकी मयुरेश पाडाळे आणि सिद्धांत आल्हाट हे दोघे उच्च शिक्षण घेत होते; तसेच वडिलांच्या बांधकाम व्यवसायातही मदत करत होते. तर कुणाल चोरडिया हा चिंचवडमधील इंदिरा कॉलेजमध्ये बीबीए अभ्यासक्रम शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाकड, थेरगाव, चिंचवड आणि महाळुंगे परिसरात शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या उंबरठ्यावरच तरुणांचे आयुष्य संपल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Kota Car Accident
Pimpri Property Tax Recovery: पिंपरीत मालमत्ता कर वसुलीसाठी आक्रमक मोहीम; थकबाकीदारांची नावे जाहीर

या अपघाताची माहिती सर्वप्रथम पिंपरी- चिंचवड येथील सार्थक तुपे याला मिळाली. सिद्धांत आल्हाट यांच्या मोबाईलमधील इमर्जन्सी फीचर अपघाताच्या वेळी आपोआप सक्रिय झाले आणि त्याचा मित्र सार्थक तुपे यांना इमर्जन्सी मेसेज प्राप्त झाला. गाडीचा अपघात झाला आहे, असा स्पष्ट उल्लेख असलेल्या या मेसेजमुळे सार्थक हादरून गेला. त्याने तात्काळ सिद्धांतला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्याने इतर मित्रांना संपर्क साधला. काही मित्र दुसऱ्या फॉर्च्यूनरमधून मागून येत होते. त्यांनाही या अपघाताची कल्पना नव्हती. सार्थकच्या फोननंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ते पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. रस्त्याच्या कडेला चुराडा झालेली गाडी, आजूबाजूला विखुरलेले काचेचे तुकडे आणि रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आपलेच मित्र. काही तासांपूर्वी हसत-खेळत प्रवास करणारे हेच मित्र आता निपचीत पडलेल्या अवस्थेत पाहून सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला.

Kota Car Accident
Pimpri Gudi Padwa Shopping: गुढीपाडव्याच्या खरेदीने पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा गजबजल्या

बर्फवृष्टीतून झाली होती सुटका...

या तरुणांचा ग्रुप काही दिवसांपूर्वी लेह- लडाखमधील कारगिल परिसरात प्रचंड बर्फवृष्टीमुळे अडकला होता. रस्ते बंद झाल्याने ते सलग पाच दिवस एकाच ठिकाणी थांबले होते. त्यांना पुढे जाता येत नव्हते. त्यानंतर स्थानिक स्तरावर प्रयत्न करून बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला आणि सर्व तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. त्या संकटातून सुखरूप बाहेर पडलेले हेच तरुण काही दिवसांतच भीषण अपघातात मृत्युमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबीयांशी चर्चा सुरू: खा. बारणे

या अपघातानंतर सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याची माहिती खा. श्रीरंग बारणे यांनी दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात ही घटना घडली असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तिघांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम पूर्ण झाले असून नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेह पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यासाठी एअर म्बुलन्सचा पर्याय असून, सुमारे 300 किलोमीटर अंतर असल्याने विमानाने की रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह आणायचे याबाबत कुटुंबीयांशी चर्चा सुरू असल्याचे खा. बारणे यांनी माध्यमांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news