

पिंपरी: हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा. गुढी पाडवा सणासाठीच्या साहित्य खरेदीचा उत्साह बुधवार (दि. 18) बाजारपेठेत दिसून आला. पिंपरी, चिंचवडसह उपनगरातील सर्वच बाजारापेठा गर्दीने फुलल्या होत्या.
गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी आंब्याची पाने, फुले, माळा अन् विड्याची पाने खरेदीसाठी दिवसभर गर्दी दिसून आली. सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या होत्या. नव वर्षातील पहिल्या मुहूर्तावर वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रिक वस्तूंची दुकाने, वाहनांचे शोरूम तसेच सोने-चांदी दुकानांतही आगाऊ नोंदणीसाठी गर्दी दिसून आली.
शहर परिसरात गुढीपाडव्याच्या सणानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी, कडुलिंब पाने, आंब्याची पाने, रेशमी कापड आणि आकर्षक कलश यांची विक्री अधिक प्रमाणात झाली. विशेषतः वेगवेगळया रंगाच्या आणि आकाराच्या साखरेच्या गाठींना मोठी मागणी असून विक्रेत्यांकडे अनेकांनी आगाऊ नोंदणी केली होती. तसेच फुले, हारांनाही मागणी होती. झेंडू, मोगरा, गुलाब यांसारख्या फुलांनी बाजारपेठात दरवळ होता. महिलांनी देखील घर सजावटीसाठी विविध प्रकारची फुले आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले.
दुकाने, मॉल्स आणि बाजारपेठांमध्येही विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची अनेक मंडळांकडून पूर्व तयारी करण्यात येत होती. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम या सणात अनुभवायला मिळतो. अनेकांनी घरासमोर सजावट आणि साफसफाई केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, मिठाईच्या दुकानांतही खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. आंबा खरेदीसाठी देखील फळबाजारात गर्दी झाली होती.
नॅनो गुढीचा ट्रेंड
बाजारात नॅनो गुढीच्या प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध होता. पूर्वी साध्या गाठींचीच जास्त विक्री होत होती. मात्र, आता ग्राहकांच्या आवडी निवडीनुसार फुलांच्या आकाराच्या; तसेच रंगीतगाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गुढीचेही विविध प्रकार आणि वेगवेगळ्या आकारातील नॅनो गुढ्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
घर, वाहने अन् सोने खरेदीचा उत्साह
गुढीपाडव्या दिवशी खरेदीचा उत्साह देखील अधिक असतो. त्यामुळे नवी वास्तू, सदनिका, वाहन अथवा सोन्याची दागिन्यांची खरेदीत मोठी उलाढाल होत असते. ज्वेलर्सच्या दुकानांतही आगाऊ नोंदणीसाठी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होती.