

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम गृहिणींच्या दैनंदिन स्वयंपाक व्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर झपाट्याने वाढला आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल, खानावळी आणि लहान व्यावसायिकांनी देखील इंडक्शन वापराकडे मोर्चा वळवला आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे सध्या देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ग््रााहकांना सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नाहीत; तसेच वितरणात होणारा उशीर आणि वाढती मागणी यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी अन्न पदार्थ शिजविण्यासाठी इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. विशेषतः नोकरदार वर्ग आणि लहान कुटुंबांमध्ये इंडक्शन हा सोयीस्कर पर्याय ठरत आहे.
हॉटेल व खानावळी चालकांनाही गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, त्यांनी इंडक्शनच्या माध्यमातून काही प्रमाणात व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इंडक्शनवर मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ तयार करण्यास मर्यादा असल्या तरीदेखील चहा, नाश्ता असे झटपट बनवू शकणाऱ्या पदार्थांसाठी इंडक्शन उत्तम पर्यात ठरत आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना आवश्यक
नागरिकांनी प्रशासनाकडे गॅसपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नियमित आणि वेळेवर सिलिंडर उपलब्ध झाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अन्यथा, भविष्यात इंडक्शनसारख्या पर्यायांवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या तरी, गॅस तुटवड्यामुळे इंडक्शन हा नागरिकांसाठी दिलासा देणारा पर्याय ठरत असला, तरी दीर्घकालीन उपाय म्हणून गॅस पुरवठा सुधारण्याची गरज अधोरेखित होत आहे.
इंडक्शनचे फायदे अन् मर्यादा
गॅसच्या तुलनेत सुरक्षित आणि वापरण्यास सोपा
विजेवर चालत असल्याने सिलिंडरची गरज नाही
स्वच्छता आणि देखभाल सोपी
मात्र, वीज बिलात वाढ होण्याची शक्यता
मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी मर्यादा
इंडक्शनचे दर
साधे इंडक्शन स्टोव्ह : 1,500 ते 2,500
मध्यम दर्जाचे (अधिक फिचर्ससह) : 2,500 ते 4,000
व्यावसायिक वापरासाठी इंडक्शन : 7,000 ते 15,000
इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये इंडक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. काही ठिकाणी स्टॉक कमी पडत असून, नवीन माल मागवावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून इंडक्शनची विक्री दुप्पट झाली आहे.
रमेश चौधरी, विक्रेते