

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड स्मार्ट व क्लिन सिटीला गेल्या सात वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला दररोज पाणी देण्यास सत्ताधारी भाजपसह प्रशासन अपयशी ठरले आहे. दररोज पाणी मिळावे, यासाठी आखणी काही काळ शहरवासीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा सुरु केला. बुधवार (दि. २५) तारखेला त्याला सात वर्ष पूर्ण होत आहेत. महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने तसेच, महापालिकेची अशुद्ध पाणी उपसा करण्याची तसेच, शुद्धीकरण प्रक्रिया करण्याची मोठी क्षमता नसल्याने समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्याला सात वर्षे उलटूनही परिस्थिती कायम असल्याने महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाच्या तसेच, सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहराला सध्यस्थितीत पवना धरणातून ५२० एमएलडी, आंद्रा धरणातून ९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून २५ एमएलडी असा एकूण ६३५ एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. शहराच्या चारही बाजुंनी मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या झाल्या आहेत. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून ठप्प असलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे. मुळशी धरण तसेच, ठोकरवाडी धरणातून पाणी मिळावे, यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
मात्र, पाण्याच्या या नव्या स्त्रोतांबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने भविष्यात शहरावर पाणी संकट निर्माण होण्याचा धोका आहे. शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना महापालिकेकडून सध्यस्थितीत निम्माने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या सोसायट्यांना उर्वरित पाण्यासाठी खासगी टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांवर आर्थिक भार कायम आहे.
भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचे काम कासव गतीने सुरू आहे. ते पाणी जानेवारीअखेरपर्यंत शहराला मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर, थेट आंद्रा धरणातून स्वच्छ पाण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अडीच वर्षात तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भूमिगत जलवाहिनीद्वारे स्वच्छ १०० एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. सध्या निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिप्रदूषित असल्याच्या तक्रारी आहेत.
भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, असे आश्वासन पूर्वी प्रशासनकडून देण्यात येत होते. मात्र, झट्यापाने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे शहराला दररोज पाणी मिळणे अशक्य वाटत आहे. त्याला अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळत आहे.
मुळशी, ठोकरवाडी धरणातून पाणी आणण्याचे प्रयत्न
पिंपरी-चिंचवडचा भविष्याचा आणि सन २०२४७ च्या लोकसंख्येसाठी शहराला तब्बल 32 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी महापालिका प्रशासन टाटा कंपनीच्या मुळशी येथील खासगी धरणातून ७६० एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र महापालिका प्रशासनाने डिसेंबर २०२३ ला जलसंपदा विभाग व टाटा कंपनीला दिले. मात्र, तीन वर्ष होत आले तरी याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. असे असताना महापालिकेचे टाटा कंपनीच्याच ठोकरवाडी धरणातील पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
३५ टक्के पाणीगळती कायम
पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असले तरी महापालिकेची यंत्रणा सक्षम न झाल्याने तसेच, पाणीचोरी, अनधिकृत नळजोडावर कारवाई, गळती आदींबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याने शहरात अद्यापही तब्बल ३५ टक्के पाणीगळती कायम आहे. अमृत योजना, २४ तास पाणीपुरवठा, अनधिकृत नळजोड तोडून अधिकृत करणे, नवीन जलवाहिनी टाकणे आदी कामे करूनही प्रशासनाला गळती थांबवता आलेली नाही. अनेक मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना अनधिकृतपणे नळजोड दिले जात असल्याचे चित्र आहे. तसेच, चोरून अनधिकृतपणे नळजोड घेण्याचे प्रकारही सुरूच आहेत. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
पाणी कोटा वाढवण्यासाठी पाठपुरावा
पिंपरी-चिंचवड शहरासाठी सध्यस्थितीत १० टीएमसी (७७० एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. मात्र, सन २०४७ पर्यंत शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्या लोकसंख्येसाठी ३२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. शहरासाठी पाणी कोटा वाढवावा, यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.