

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांसाठी तोंडाला मास्क लावण्यासाठी वायूरोधक मास्क व गाळणी (कॅनिस्टर मुखवटा) खरेदी करण्यात आले आहेत. त्याचा दर २५ हजार रुपये असून, एकूण २०० मास्क खरेदी केले आहेत. त्यासाठी ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
दिवाळीमध्ये रॉकेट व फटाक्यामुळे आगीच्या ७६ पेक्षा अधिक घटना शहरात घडल्या. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, त्यात अनेक घरे तसेच, दुकान व आस्थापनांचे मोठे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन विभागाच्या जवानांना धूराचा तसेच, विषारी वायूचा मोठा त्रास झाला.
अशा प्रकारे अग्निशमन जवानांना श्वसनाचा त्रास होऊ नये. त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून कॅनिस्टर मास्क ॲण्ड फिल्टरची खरेदीचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला. त्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागाने निविदा काढून, जेम पोर्टलवर दर मागवले. त्याला चार पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. त्यातील एक पुरवठादार अपात्र ठरला.
केवळ १.६ टक्के कमी दर सादर करणाऱ्या सिंक्यू सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्याच्यांकडून २०० मास्क खरेदी करण्यात येणार आहे. एका मास्कचा दर २५ हजार रुपये आहे. त्यासाठी एकूण ४९ लाख ६८ हजार ८०० रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.
अठरा साहित्यांसाठी एक कोटीचा खर्च
अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन प्रसंगी जवानांना वापरण्याकरीता विविध प्रकाराचे एकूण १८ साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागाने निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात ९७ लाख ९३ हजार ८२६ रुपये खर्चाची ग्लीम्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची एक टक्का कमी दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्यासाठी चारपैकी तीन पुरवठादार पात्र ठरले. त्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.