

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरभरात अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक करून पादचारी व सायकलस्वारांना स्वतंत्र सुरक्षित मार्ग निर्माण केला जात आहेत.
तसेच, हरित सेतू प्रकल्पात घरापासून थेट बीआरटी बसथांबा, मेट्रो व रेल्वे स्टेशनपर्यंत पायी जाता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. हे दोन्ही प्रकल्प लोकांसाठी उपयुक्त असून, ते त्यातून रस्ते सुशोभिकरण (रोड ब्युटिफिकेशन) केले जात असल्याचे समज चुकीचा आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
हरित सेतू आणि अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार रस्ते अरुंद करून पदपथ व सायकल ट्रॅक प्रशस्त करून सुशोभिकरण करण्यात येत आहे. ते काम रस्ते सुशोभिकरण नाही, असा दावा आयुक्तांनी केला आहे. वाहन चालकांप्रमाणे पादचारी व सायकलस्वारांना सुरक्षितपणे मार्ग असावा म्हणून ही व्यवस्था करण्यात येत आहे. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी नागरिकांनी स्वत:चे वाहन न वापरता पायी किंवा सायकलवर जाणे अपेक्षित आहे.
तसेच, बीआरटी थांबा, मेट्रो व रेल्वे स्टेशनपर्यंत ये-जा करण्यासाठी मार्ग जोडले जात आहेत. त्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार केले जात आहेत. सार्वजनिक व्यवस्था सक्षम केली जात आहे. शहरात बसची संख्या वाढून फेऱ्या वाढविण्यासाठी पीएमपीएलच्या निधीत यंदा वाढ केली आहे. त्या ठिकाणी वाहने पार्क होणार नाहीत. अतिक्रमण होणार नाही, यासाठी महापालिका प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणात पार्किंग व्यवस्था निर्माण करणे अशक्य आहे. घरात दोन ते तीन मोटारी असल्याने दोन वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. काही ठिकाणी जागा मिळते, तर काही ठिकाणी नाही. खासगी वाहने वापरण्यापेक्षा बस, मेट्रो किंवा फिडर रिक्षांने प्रवास करावा, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वायू व ध्वनी प्रदूषण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले.