Pimpri Chinchwad Rain Impact: पिंपरी-चिंचवडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

शहरातील सखल भाग जलमय, झाडे पडली; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
Pimpri Chinchwad Rain
Pimpri Chinchwad RainPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर आणि मावळ तालुक्याला सोमवारी (दि. 30) अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी दोननंतर आलेल्या पावसाने शहरातील सखोल भागात पाणीच पाणी झाले होते. ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. पावसामुळे चाकरमान्यांची एकच त्रेधातिरपीट उडाली. शहरात 4.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Pimpri Chinchwad Rain
Pimpri Compost Waste: पिंपरीत ओल्या कचऱ्यापासून तयार खताचा प्रश्न गंभीर

रस्त्यावर पाणीच पाणी

दुपारी सुरू झालेल्या पावसाने मध्येच विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा मेघगर्जनेसह हजेरी लावली. पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले होते. सुरुवातीला रिमझिम आणि नंतर अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. थोड्याच कालावधीत पावसाने काही रस्त्यांवर पाणी साचले होते. यातून चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. आधीच रस्त्यावर असलेल्या खड्ड्‌‍यांमुळे चालकांना पाण्यातून वाहन चालविताना जीव मुठीत धरुन जावे लागले.

याठिकाणी साठले पाणी

शहरातील नेहरूनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. तसेच, नाशिक फाटा पूल, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी याठिकाणी पाणी साचले होते.

अनेक ठिकाणचे रस्ते झाले जलमय

शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, कासारवाडी, दापोडी, मोशी, चिखली, चऱ्होली, जाधवाडी, हिंजवडी, वाकड आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे कासारवाडीतील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले होते. पाऊस आणि वाऱ्यामुळे नाशिक फाटा उड्डाण पूल येथील जाहिरात होर्डिंगवरील फ्लेक्स फाटले होते. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथे पाणीपुरवठा विभागाने रस्ता खोदून ठेवल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला होता.

Pimpri Chinchwad Rain
Pimpri Women Bike Rally: पिंपरीत महिलांची पारंपरिक बाईक रॅली

याठिकाणी गारांचा पाऊस

हिंजवडी, वाकड, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी याठिकाणी गारांचा पाऊस झाला.

याठिकाणी पडली झाडे

पावसामुळे पिंपळे गुरव, नवी सांगवी, बा. रा. घोलप कॉलेजरोड, आकुर्डीरोड याठिकाणी झाडे पडली. झाडे पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

चाकरमान्यांची तारांबळ

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजल्यापासून कडक उन्हामुळे चटके बसत होते. त्यानंतर दुपारी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. उकाडाही जाणवत असल्यामुळे दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिमनंतर जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शालेय विद्यार्थी तसेच खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसाने गाठले. आडोसा शोधेपर्यंत नागरिकांना पावसाने ओलेचिंब केले होते. छत्री आणि रेनकोट नसल्याने दुचाकीस्वार आणि पादचारी नागरिक पुलाखाली, ग््रेाडसेप्रेटरमध्ये थांबलेले दिसत होते.

पथारीवाल्यांची धावपळ

अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील पथारीवाले, रस्त्यावरील विक्रेते यांची सामान आवरण्याची धावपळ झाली. दुकानदारांनादेखील बाहेर लावलेल्या वस्तू काढून घेताना पळापळ झाली. भाजी विक्रेत्यांनीदेखील भाज्या भिजू नये म्हणून प्लास्टिक कागद, पोती अंथरली होती. पावसामुळे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Pimpri Chinchwad Rain
Pimpri Traffic Jam: पिंपळे निलख-भोसरी बीआरटी मार्गावर वाहतूक कोंडीचा कहर

मुलांनी घेतला भिजण्याचा आनंद

उन्हाच्या झळा आणि असह्य उकाडा यामुळे अवकाळी पावसामध्ये गारा वेचण्याचा आणि भिजण्याचा आनंद मुलांनी घेतला.

विजेचा लपंडाव

अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील उपनगरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. उकाडा, पाऊस आणि दमट वातावरण यामुळे नागरिक हैराण झाले होते. अचानक वीज गेल्यामुळे महिलांची घरातील कामे रखडली होती.

जागोजागी कोंडी

जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचून तळे तयार झाले होते. काही ठिकाणी रस्त्यांची कामे, बांधकामे सुरू असल्याने याठिकाणी चिखल झाला होता. शहरातील खड्ड्‌‍यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. काही ठिकाणी रस्त्यावरील खडी बाहेर पडल्याने वाहन घसरुन अपघात होत होते. पावसामुळे वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

Pimpri Chinchwad Rain
Dehuroad Kidnapping Attempt: देहूरोडमध्ये चिमुकल्याचे अपहरण फसले; नागरिकांची तत्परता

रस्ते झाले निसरडे

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 30) अचानक आलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे बनले होते. यामुळे अनेक ठिकाणी वाहने घसरुन किरकोळ अपघातांच्या घटना घडल्याचे दिसून आले. आकुर्डी, रावेत, निगडी, चिंचवड आणि पिंपरी या परिसरांमध्ये पावसामुळे दुचाकी वाहने घसरुन अपघात झाल्याची नोंद आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर साचलेली धूळ आणि वाळू चिखलात रूपांतरित झाली होती. त्यातच काही ठिकाणी वाहनांमधून ऑइल गळती झाल्याने रस्ते अधिकच घसरडे बनले. परिणामी वाहनचालकांना नियंत्रण राखणे कठीण झाले होते. विशेषतः वळणाच्या ठिकाणी आणि चौकांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक दिसून आले. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पावसाळ्यात वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कमी वेगात वाहन चालवणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि बेकचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, रस्त्यांची स्वच्छता आणि ऑइल गळती रोखण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संथ गतीच्या कामांचा नागरिकांना नाहक त्रास

महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाकडून पदपथ व सायकल ट्रॅक बनविण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी बीआरटी मार्ग बंद आहे. वल्लभनगर एसटी आगार, चिंचवड स्टेशन, पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुलाकडे जाणारा रस्ता, दापोडी, मोरवाडी चौक ते एम्पायर एस्टेट रस्ता आदी भागांत काम अर्धवट स्थितीत असल्याने पावसामुळे तेथे चिखल झाला होता. त्यात अनेकांची वाहने अडकून पडली होती. बीआरटी मार्गाऐवजी सर्व्हिस रस्त्यावरुन बसगाड्या धावत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

रस्त्यावर पसरली खडी

महामेट्रोच्या पिंपरी ते निगडी या विस्तारीत मार्गाच्या कामामुळे निगडी ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतचा सर्व्हिस रस्ता खराब झाला आहे. पावसामुळे त्यात आणखी भर पडली. सर्व रस्ता चिखल व खडीने भरून गेला. त्यामुळे वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय झाली. पादचाऱ्यांना चालणेही अवघड होऊन बसले होते. कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात होर्डिंगवरील जाहिरातीचे फ्लेक्स फाटून हवेत उडत होते. असेच प्रकार शहरातील अनेक भागात घडले. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकार पाहता पहिल्याच पावसात महापालिका प्रशासनाने मान्यूनपूर्व तयारी केली नसल्याने उघड झाले आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news