

रॅलीमध्ये बहुसंख्य महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान केली होती, तर अनेक तरुणींनी पांढरी कुर्ती आणि जीन्स अशा आधुनिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. फक्त महिलाच नव्हे, तर त्यांच्यासोबत लहान मुलेही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने वातावरणात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. मोरया गोसावी मंदिरापासून निघालेली ही रॅली पिंपरीतील नियोजित मार्गावरून प्रवास करीत डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र-पिंपरी येथे उत्साहात संपन्न झाली. त्यानंतर सहभागी सर्व महिलांना दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
लाइक्स, कमेंट्स अन् स्टेटस
सोशल मीडियावर लाइक्सचा मीटर, कमेंट्सचा धडाका आणि स्टेटसवरील फोटोमुळे दुचाकी रॅली अगदी काही क्षणातच पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कानाकोपऱ्यात पोहचली अन् महिला देखील भारावल्या. निमित्त होते दै. ‘पुढारी’ आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित बाईक रॅलीचे. नारीशक्तीच्या दुचाकी रॅलीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर काही क्षणातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रॅली ट्रेंडिंग झाली होती.
महिला पोलिसांचाही सहभाग
महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. किरकोळ आजार अंगावर काढण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे पुढे जाऊन महिलांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. महिलांनी स्वत:ची काळजी घेतली, तर त्यांच्या परिवारासाठी चांगले आहे. स्वत:ची काळजी घ्या, आरोग्य सांभाळा, असा संदेश महिला पोलिसांनी दिला. महिला पोलिसांमध्ये पूनम देवरे, मुस्कान आगा, ललिता फडतरे, आरती बुंदेले, रब्बाना सनदी, पौर्णिमा टेमकर यांचा सहभाग होता.
डॉ. अश्विनी मते आणि न्याती मते : राम-सीता
मी सीतेची आणि माझ्या मुलीने प्रभू श्री रामाची वेशभूषा केली आहे. दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये आम्हाला ही संधी मिळाली, याबद्दल मी डॉ. अश्विनी आणि माझी कन्या न्याती मते मनापासून आभार व्यक्त करतो.
माता जिजाऊ अन् बाल शिवराय
रॅलीमध्ये सहभागी दीपाली थोरात यांनी राजमाता जिजाऊ आणि त्यांचा मुलगा क्रीश्व याने बाल शिवरायांची वेशभूषा केली होती. या दोघा मायलेकांच्या वेशभूषेने रॅलीतील सहभागींचे लक्ष वेधले.
पारंपरिक वेशभूषा
श्यामली ठाकरे यांची मुलगी शिवाली आणि सुरभी जाधव यांची मुलगी आलेशा यांनी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने घालून रॅलीमध्ये सहभागी होत नथीचा तोरा मिरविला. याबद्दल श्यामली आणि सुरभी म्हणाल्या, की मुलींना आत्तापासूनच अशा कार्यक्रमांमधून संस्कृती आणि परंपरेची ओळख होईल.
चंद्रघंटा (नवरात्रीतील देवीचे रूप)
या वेळी नभा करंदीकर ह्या चंद्रघंटा देवीची वेशभूषा परिधान करून बाईक रॅलीत सहभागी झाल्या होत्या. नऊवारी साडी, हातात जपमाळ, डोक्यावर चंद्रकोर अशी आकर्षक वेशभूषा त्यांनी केली होती. वेशभूषेबद्दल त्या म्हणाल्या की, चंद्रघंटा ही नवरात्रोत्सवातील देवीचे तिसरे रूप आहे.