

परमेश्वर वाव्हळ
खराळवाडी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील बहुतांश अर्बन सिटी अंतर्गत विकासकामे सुरू आहेत. परंतु ही कामे म्हणजे अंगापेक्षा बोंगाच मोठा आशी असल्याची खोचक टीका नागरिक करत आहेत. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराचा फटका पिंपरी चिंचवड शहरातील करदात्यांना बसत आहेत. बहुतांश प्रकल्प महापालिकेने राबविले परंतु ते जनतेच्या हितासाठी की ठेकेदार पोसण्यासाठी आशी चर्चा नागरिकांत सुरू आहे. शहरातील बहुतांश रस्त्याची स्थिती आज विस्तृत पदपथ आणि अरुंद रस्ते आशी झाल्याने शहरवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहरात सुरू असलेल्या खोदकामामुळे व लगीनसराईच्या धावपळीत पिंपरी शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून, महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे शहरातील अनेक भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यात कित्येक तास नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी नागरिकांना अनेक वेळा वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या शगुन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक, मोरवाडी चौक, महावीर चौक, साई चौक, पुणेकडून काळेवाडीकडे जाणारा रस्त्यावर चारचाकी वाहने अनधिकृतपणे पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातील खराळवाडी, जामा मस्जिद, पिंपरी स्टेशन रोड, त्रैलोक्य स्मशानभूमी रस्ता, संजय गांधीनगर समोर पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक भागात चालू असलेल्या रस्ते खोदकामामुळे अनेक रस्त्यांवर एका बाजूने वाहतूक रहदारीला मार्ग मोकळा केला आहे. मात्र, वर्दळीच्या चौकात वाहतूक रहदारीला अडथळा येतो अशा चौकात वाहने सावकाश चालवा किंवा हळूहळू सुलभपणे चालवणे या बाबतीत योग्य वाहनचालकांचे लक्ष वेधून घेणारे दिशा दर्शवणारी फलक, बॅरिकेड्स किंवा वाहतूक कंट्रोल करण्यासाठी पुरेशी साधने नसल्यामुळे बाहेरील ठिकाणाहून येणारे नागरिक हवालदिल होऊन जातात. याचा परिणाम अजून वाहतूक रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
या भागात सर्रास रस्त्यावर अतिक्रमण
शगुन चौक, संत गाडगेबाबा चौक, रिव्हर रोड, डिलक्स चौकापासून काळेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर खेळणीवाले, हारवाले, फुगेवाले, हातगाडीवाले, फेरीवाले यांनी रस्त्यातच दुकाने थाटली आहेत. झुलेलाल बाजार मार्केटपासून काळेवाडी, राहाटणी, पिंपरीगावाकडे जाण्यासाठी नागरिकांना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे या भागात नागरिकांना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कारवाईची गरज
मॉलसमोरील अतिक्रमणे, हातगाडी, फेरीवाले यांना रस्त्यात बसून न देणे. चौकातील अनधिकृत रिक्षा स्टँड यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच मेट्रो व इतर कारणासाठी येणार्या नागरिकांना वाहनतळ उपलब्ध करून देणे त्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
विरुद्ध दिशेने होतेय वाहतूक
पिंपरी मार्केट परिसरात बहुतांश भागात वनवे रस्ते आहेत. परंतु वाहनचालक वळसा मारण्यापेक्षा शॉर्टकट वापरतात. अनेकदा विरुद्ध दिशेने प्रवास करतात यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होत आहे. पिंपरी चौकापासून ते साई चौकापर्यंत रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यामुळे पदपथच गायब झाले आहेत. पादचारी नागरिकांच्या मते विकासकामे सुरू करण्यापूर्वी वाहतूक, रहदारी, वाहनतळ पर्याय मार्ग अतिक्रमण नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. परंतु नियोजनात कमतरता असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक कोंडी, अनियंत्रित वाढ, पुनर्विकासाचा वेग आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे कोंडीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. तसेच योग्य नियोजन गरजेचे आहे
गणेश राऊत, नागरिक
मोरवाडी चौक, शगुन चौक, पिंपरी चौक, महावीर चौक, काळेवाडी मार्गे जाणारे वाहने बीजवरून जातील व वाहतूक कोंडी होणार नाही. पिंपरी काळेवाडी बिज झाल्यानंतर सत्तर टक्के वाहतूक सुरळीत होईल.
अमित डोळस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पिंपरी