

मिलिंद कांबळे
पिंपरी: प्राणिप्रेमी नागरिकांकडून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांत जाऊन भटक्या कुत्र्यांना शिल्लक अन्न व खाद्य टाकले जाते. त्यात टाकाऊ चिकनचे प्रमाण अधिक असते. त्या माध्यमातून विनासायास भूक भागत असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. एखाद्या दिवशी अन्न मिळण्यास विलंब झाल्यास किंवा न मिळाल्यास ते हिस्त्र होतात. त्यातून नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचे प्रकार वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. प्राणिप्रेमींची भूतदया शहरवासीयांच्या जीवावर बेतत आहे.
हल्ल्यात महिलेचा मृत्यू
शहराशेजारील चाकण येथे एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत अक्षरश: लचके तोडले होते. त्यात त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यावरून नगरसेवकांनी प्रशासनावर ताशेरे ओढत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
शहरातील काही प्राणिप्रेमींकडून भटक्या कुत्र्यांना अन्न दिले जाते. हॉटेल, टपऱ्याकडील शिल्लक अन्नपदार्थ तसेच, शिजवलेला भात, चिकनची हाडे व तुकडे एका डब्यात किंवा बादलीत भरून परिसरात फिरून कुत्र्यांना दिले जाते. काही जण बिस्किट खाऊ घालतात. दुचाकी, कार, टेम्पोतून फिरत ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेला हे अन्न दिले जाते. त्या वेळेला त्या परिसरातील मोकाट 25 ते 30 कुत्री एका ठिकाणी जमा होतात. मिळालेले अन्न खाऊन ती निघून जातात. अशा प्रकारे दिवसातून एक ते दोन वेळा कुत्र्यांना अन्न पुरवले जाते. तसेच, काही रहिवाशी शिल्लक अन्नपदार्थ रस्त्यावर टाकतात. उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकारही वाढले आहे. त्यातील अन्नातून भटक्या कुत्र्यांची भूक भागते. परिणामी, कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यास अपयश
महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. असे असताना कुत्र्यांची संख्या काही नियंत्रणात येत नसल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस शहरात कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. परिणामी, कुत्र्यांकडून नागरिकांवर विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले करण्याचे प्रकार काही कमी होत नसल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कुत्र्यांना खाद्य देणाऱ्यांची महापालिकेकडे नाही माहिती
भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना अन्न व खाद्य देणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला प्राणिप्रेमींनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे शहरात किती नागरिक, संस्था भटक्या कुत्र्यांना अन्न देतात, याची नोंद महापालिकेकडे नाही. तसेच, पाळीव कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे, याचीही माहिती उपलब्ध नाही.
शहरात पहिल्या टप्प्यात भटक्या कुत्र्यांसाठी चार ठिकाणी निवारागृह तयार करण्यात येत आहे. तेथे त्यांना नियमितपणे अन्न दिले जाणार आहे. प्राणिप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून कुत्र्यांना अन्न व खाद्य देणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार, शहरात फिडींग पॉईंट सुरू करण्याचे नियोजन आहे. फिडींग पॉईंट सोडून इतरत्र विनापरवाना अन्न व खाद्य देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन आहे. तसेच, कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
संदीप खोत, उपायुक्त, महापालिका