Pimpri Women Bike Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली; नारी शक्तीचा जल्लोष

पारंपरिक वेशभूषेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक संदेश देत शहरभर रॅलीची दणदणीत नोंद
Pimpri Women Bike Rally
Pimpri Women Bike RallyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पारंपरिक नऊवारी साडी, डोक्यावर भगवा फेटा, तसेच पांढरा कुर्ता व निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेल्या तरुणी आणि महिलांची रॅली शहरवासीयांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायोजित दैनिक पुढारी आणि पुढारी ‌‘कस्तुरी‌’ क्लबच्या वतीने शनिवार (दि. 28) रोजी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित बाईक रॅलीमध्ये नारी शक्तीचा जागर करण्यात आला. खाकी वर्दीतील तसेच महिला वाहतूक पोलिसांचा रॅलीतील सहभाग लक्षवेधी ठरला. नारी शक्ती तसेच, ‌‘जय भवानी, जय शिवाजी‌’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. फुलांचा वर्षावात अन फटाके फोडून जागोजागी रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

Pimpri Women Bike Rally
Akurdi Power Cut Issue: आकुर्डी, निगडी, चिंचवडमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

रॅलीत सहभागी होण्यासाठी चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात महिलांनी शनिवारी सकाळी सहापासून हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसर उत्साहाने भारून गेला होता. पुण्यातील कसबा पेठेतील शिवतेज ग्रुपच्या तरुणींच्या ढोल-ताशाच्या दमदार वादनाने वातावरणात जोश संचारला होता. सहभागी महिलांच्या डोक्यावर भगवे फेटे बांधण्यात आले. आकर्षक वेशभूषा केलेल्या महिला, डोक्यावर ऐटदार फेटा तसेच, सजवलेल्या दमदार बाईकची गर्दी पाहून परिसरातील नागरिकही हरखून गेले होते. महिलांसोबत लहानग्याही सजून आल्या होत्या. रॅली सुरू होण्यापूर्वी सहभागी महिलांनी नृत्य करत तसेच, फुगडीचे फेर धरत रंगत आणली. ग्रुप फोटो तसेच, बाईकसोबत छायाचित्र काढण्यासाठी अनेक महिला सरसावरल्या होत्या. अनेक महिला आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत होत्या. प्रथम श्री मोरया गोसावी गणपती मंदिरात ‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा

Pimpri Women Bike Rally
Lonavala Petrol Pump Assault: लोणावळ्यात ₹1 वादातून पेट्रोल पंपावर हल्ला; कर्मचाऱ्यांना मारहाण

डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, उपमहापौर शर्मिला बाबर, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ‌‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया‌’चा एकच गजर करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, ‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, उपमहापौर शर्मिला बाबर, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. या वेळी मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, क्रस्ना डायग्नोस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक यश मुथा, टायगर ब्रॅण्डचे नीलेश बोथरा, सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे भुपेंद्रसिंग, पीएमआरडीए वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सुरेश वाडकर, दिनेश ॲडव्हर्टायझिंगचे दिनेश लिंगवत आदी मान्यवर उपस्थित होते; तसेच दै.पुढारी पुणे विभागाचे व्यवस्थापक सुनील लोंढे, उप सरव्यवस्थापक विजय शिरगावकर, निवासी संपादक सुनील माळी, एचआर विभाग प्रमुख आनंद कुलकर्णी, उप सरव्यवस्थापक वितरण विभाग वैभव जाधव, पिंपरी-चिंचवड वितरणप्रमुख विजय जाधव, कस्तुरी क्लबच्या योगिता पवार आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप व शाल देऊन करण्यात आले.

Pimpri Women Bike Rally
Talegaon Dabhade Committees Election: तळेगाव दाभाडे नगर परिषदेत समित्यांची बिनविरोध निवड

रॅलीच्या सुरुवातीला खाकी वर्दीतील महिला पोलिस आणि वाहतूक महिला पोलिसांचा ताफा होता. त्यामागे रॅलीत पारंपरिक तसेच आधुनिक पेहराव केलेल्या महिला सजवलेल्या बाईकवर स्वार झाल्या होत्या. काही महिलांनी मोरपिसे, तर, काही महिलांनी पान-फुले तसेच, भगव्या झेंड्यांनी बाईक सजवली होती. एका बाईकवर राजमाता जिजाऊच्या वेशभूषा केलेली महिला आणि बालशिवरायांची वेशभूषा केलेला चिमुकला स्वार झाले होते. हातात धनुष्यबाण घेतलेली श्रीरामाच्या वेशभूषेतील मुलगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. डोक्यावर विठ्ठल व रुक्मिणीची मूर्ती घेतलेली महिला पाहताच सर्वांचे हात जोडले जात होते. काहींच्या हातात सामाजिक तसेच, महिला शक्तीचे संदेश देणारे फलक होते. तर, काहींच्या हातात पुढारीचा ध्वज डौलाने फडकत होता. श्री मोरया गोसावी मंदिरापासून निघालेल्या रॅलीचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. चिंचवडगावात चिंचवडचा राजा मित्र मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे व कार्यकर्त्यांनी नकली तोफेतून कागदांच्या झुरमुळ्यांचा वर्षाव करत स्वागत केले. चापेकर चौकात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे फुलांचा वर्षाव करत रॅलीचे स्वागत करण्यात आले.

Pimpri Women Bike Rally
Lonavala Municipal Protest: लोणावळ्यात नगरपरिषद वादावर पडदा; कार्यालयाचे कुलूप काढले

पुढे ही रॅली चिंचवड बस स्थानक येथून एल्प्रो मॉल, लिंक रस्ता, पिंपरी मार्केट, इंदिरा गांधी उड्डाणपूल, मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात (फिनोलेक्स चौक) पोहचली. तेथून पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील रस्त्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रॅली पोहचली. तेथे दुर्गा ब्रिगेडच्या वतीने रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुर्गा ब्रिगेडच्या दुर्गा भोर व अभय भोर तसेच, सदस्यांनी फटाके फोडून व फुलांचा वर्षाव केला. तेथून रॅली खराळवाडी, एचए कॉलनी, संत तुकारामनर मेट्रो स्टेशन, वल्लभनगर एसटी आगार येथून अग्निशामक दल येथील गोल मार्केट चौकातून जाऊन डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. शिस्तबद्धरित्या एका रांगेत बाईक थांबवत महिलांनी अनोखी मानवंदना दिली. तेथेही शिवतेज ग्रुपच्या तरुणींनी जोरदार ढोल-ताशा वादन केले. ढोलच्या ठेक्यावर सहभागी महिलांनी नृत्याचा आनंद घेतला. काहींनी फुगडीचा फेर धरला. तेथील सेल्फी पॉईंटवर महिला मोबाईलमध्ये छायाचित्र टिपत होत्या.

Pimpri Women Bike Rally
PMPML Seven Pay Commission: पिंपरीत पीएमपीएमल कर्मचाऱ्यांना 56 कोटी मंजूर; स्थायी समितीचा निर्णय

‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या पाच महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, विशेष वेशभूषा करणाऱ्या ग्रुपच्या लीडरला मानाची साडी भेट देण्यात आली. रॅली समारोपानंतर सहभागी महिलांची डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र, कान, नाक, घसा तपासणी करून आयुर्वेद सल्ला व पंचकर्म उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व महिलांना डीपीयू आयुर्वेद आरोग्य कार्ड मोफत दिले. तसेच, क्रस्ना डायग्नोस्टिकच्या वतीने महिलांची मोफत रँडम रक्त तपासणी करण्यात आली. तसेच, विविध तपासण्यांसाठी 20 टक्के सवलत असलेले डिस्काउंट व्हाऊचरचे वाटप करण्यात आले. दरम्यान, महिलांनी अल्पोहाराचा आस्वाद घेतला. सहभागी सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

Pimpri Women Bike Rally
Pimpri Chinchwad Snake Sightings: पिंपरी-चिंचवडमध्ये सापांचे दर्शन वाढले; मिलन हंगामामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रॅलीतून सामाजिक संदेश

रॅलीत महिलांनी सामाजिक संदेश देणारे फलक धरले होते. पाणी वाचवा, प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरा. प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरण वाचवा. स्वच्छता राखा, कचरा उघड्यावर टाकू नका. स्वच्छता सर्व रोगाचे एकमेव औषध आहे, असे विविध सामाजिक संदेश देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच, जय हो नारी शक्ती की, महिला शक्तीचा विजय असो असेही फलक झळकावण्यात आले.

नागरिक, स्वयंसेवी संघटनांकडून रॅलीचे स्वागत

रॅलीच्या संपूर्ण मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून रॅलीचे स्वागत केले. तसेच, हात उंचावून प्रोत्साहन दिले. अनेक सामाजिक संघटना व संस्थांकडून रॅलीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच, फटाके फोडण्यात आले. अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रॅलीचे छायाचित्र तसेच, व्हिडीओ रेकॉर्डिंग केले.

वाहतूक पोलिसांमुळे रॅली विनाअडथळा

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी जागोजागी तसेच, चौकांचौकात वाहतूक नियंत्रण करत महिलांच्या बाईक रॅलीस मार्ग करून दिला. तसेच, रॅलीच्या शेवटी पोलिसांचे एक खास वाहन तैनात करण्यात आले होते. तसेच, पोलिस अधिकारी जातीने वाहतूक रहदारीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे चिंचवडगाव ते पिंपरीतील संत तुकारामनगर या संपूर्ण मार्गावर रॅली विनाअडथळा पार पडली. तसेच, वाहतूक कोंडीचा खोळंबा झाला नाही. इतर वाहनचालकांना कोणताही त्रास झाला नाही.

मानाच्या साडीच्या मानकरी

महिलांच्या आनंदाला आणि उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी बाईक रॅलीमध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषा केलेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच, विशेष वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला ग्रुप लीडरला मानाची साडी भेट देण्यात आली. यामध्ये स्वायत्ता प्रतिष्ठानच्या निर्मला जगताप, कस्तुरी विभागप्रमख सोनाली निकम, ज्योती आनंद हागरगी, आरती जगताप, संगीता घाडगे, रुही कुरेशी, सारिका कदम, डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथीच्या डॉ. वैशाली खोब्रागडे, अर्पणा मिसाळ, दुर्गा भोर, रेखा दुसाने यांना भेटवस्तू देण्यात आली.

आकर्षक वेशभूषा करणाऱ्या महिलांचा सन्मान

बाईक रॅलीत आकर्षक वेशभूषा करून महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. आकर्षक वेशभूषा करणाऱ्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये सारिका कदम, डॉ. अश्विनी मते, नभा करंदीकर, ृतिका लोखंडे, शामली ठाकरे, सृष्टी गाजरे, दीपाली थोरात यांना भेटवस्तू बक्षीस देण्यात आल्या.

सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू

रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. रॅलीचे गिफ्ट पार्टनर असलेल्या सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरी, टायगर ब्रॅण्ड मसाले यांच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. भेटवस्तू पाहून महिलांचा आनंद गगनात मावत नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news