

पिंपरी: नोकरीतील अनिश्चितता, कामाचे टार्गेट, वेळा आणि तुलनेने कमी वेतन अशा अनेक कारणांमुळे तरुण वयातच अनेकांनी उद्योग व्यवसायाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 79 हजार जणांनी शॉप ॲक्टचा परवाना काढला असून, त्याअंतर्गत व्यवसायाचा श्रीगणेशा केला आहे. याआधारे दर महिन्याला जवळपास साडेसहा हजार जण नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तर, अनेकजण नव्याने शोधात आहे.
पुणे, पिंपरर-चिंचवड औद्योगिकनगरी म्हणून राज्याच्या कानकोपऱ्यातून कामगार, नागरिक येत असतात. या ठिकाणी नोकरी करतानाच अनेकांना व्यवसाय करण्याची ओढ लागते. त्यात नुकतेच ऑनलाईन विक्री, सर्व्हिस सेक्टर, फँचायझी, फुड अशा वेगवेगळ्या नव्याने व्यवसायाकडे हे तरुण आकर्षित होत आहेत. यापूर्वी वाहनांवर चालक म्हणून काम करणारे अनेक तरुण हे स्वतः वाहन खरेदी करत मालक झाले असून, त्याद्वारे नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
नोकरी आहेच, पण त्याची अनिश्चितता, वेळा आणि त्यातून होणारी कष्टाचे काम, पिळवणूक अशा कारणांमुळे नोकरीला रामराम केला आहे. तर, त्यापेक्षा आता उद्योग व्यवसायांचा मार्ग स्वीकारला आहे. त्यात तरुणासाह मध्यमवर्गही स्वतःच्या व्यवसायाकडे वळला आहे. त्यातच ऑनलाईन नोंदणी सुलभ झाल्याने किरकोळ दुकाने, सेवा व्यवसाय, घरगुती उद्योग, स्टार्टअप, लघुउद्योग या व्यवसायांची संख्या वाढत आहे.
नोंदणीचा वाढता आलेख
व्यवसायासाठी शॉप ॲक्टचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी दिवसाला जवळपास 500 ते 600 अर्ज येतात. ते महिन्याला जवळपास साडेसहा हजारपर्यंत जातात. सप्टेंबरपासून या नोंदणीमध्ये वाढ होत आहे. डिसेंबरअखेरीस 69 हजार 439 जणांनी नोंदणी केली आहे. तर, अनेकांचे अर्ज प्रलंबित असून ती संख्या जवळपास 75 हजारांच्या आसपास आहे.
म्हणून व्यवसायास पसंती
नोकरीतील अस्थिरता, कमी वेतन
कामाचा अतिरीक्त ताण, वेळा
टार्गेट आणि ताणतणाव
वेगवेगळया कंपनीत काम केल्यानंतर ई कॉमर्सबद्दल माहिती मिळाली. आता सर्व्हिस सेक्टरमध्ये काम सुरू केले. आता नव्याने व्यवसाय उभारुन हक्काची कमाई मिळत आहे.
संतोष चौधरी, वाकड