Police patrol technology: पिंपरी-चिंचवड पोलिसांचे तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा

‘पीसी सिटी शिल्ड’ ॲपद्वारे पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती सुनिश्चित, फोटो व जिओ टॅगिंगसह रिअल टाइम डेटा
Police patrol technology
पिंपरी-चिंचवड पोलिसांचे तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळाPudhari
Published on
Updated on

पिंपरी : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस गस्त ही सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते. गस्तीवर प्रत्यक्षात पोलिस गेले का, याची खात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी मागील काळात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने बारकोड स्कॅनिंग प्रणाली सुरू केली होती; मात्र या प्रणालीतील काही उणिवांचा फायदा घेऊन गस्तीवरील काही पोलिसांनी शिताफीने बनवाबनवी सुरू केली. (Latest Pune News)

या प्रकारानंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गस्त अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी जिओ टॅगिंग व फोटो अपलोड प्रणाली लागू केली आहे. या नव्या यंत्रणेने बनवाबनवीला आळा बसला असून, पोलिसांची गस्त प्रभावी होत असल्याचा दावा केला जात आहे.

Police patrol technology
BRT Lane Violation: बीआरटी मार्गात घुसखोरी केल्यास वाहन परवाना रद्द

..अशी सुरू होती बनवाबनवी

गस्त कितपत होत आहे, याची अचूक नोंद राहावी म्हणून संवेदनशील ठिकाणी बारकोड टॅग बसवण्यात आले होते. गस्तीवरील पोलिसांनी ठराविक ठिकाणी जाऊन तो कोड स्कॅन करणे बंधनकारक करण्यात आले होते. हा कोड स्कॅन होताच नोंद पोलिस नियंत्रण कक्षात होत असे. मात्र, काही हुशार पोलिसांनी या प्रणालीतील उणिवा शोधल्या. काहींनी संबंधित पॉईंटवरील बारकोडचे फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले. ज्यामुळे ते कुठूनही बसल्या जागी स्कॅन करता येऊ लागले. त्यामुळे प्रत्यक्ष गस्तीवर न जाता ‌‘गस्त घालण्यात आली‌’, असा खोटा अहवाल नियंत्रण कक्षात पोहचत होता. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बारकोड प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅगिंग प्रभावी; कामचुकार अडचणीत

बारकोड बनवाबनवी समोर आल्यानंतर आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तत्काळ हा प्रयोग बंद करून नवीन तंत्रज्ञानाचा पर्याय आणला. आता ‌‘पीसी सिटी शिल्ड‌’ ( झउ उळूीं डहळशश्रव) नावाचे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे प्रत्येक गस्ती पॉईंटवर पोहोचल्यावर संबंधित पोलिसांना आपल्या मोबाईलवरून थेट फोटो अपलोड करावे लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्या फोटोसोबतच आपोआप लोकेशनची जिओ टॅगिंग माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचत आहे. त्यामुळे पोलिस खरोखरच त्या ठिकाणी गेले की नाही, याबाबत कोणतीही शंका राहत नाही. या ॲपमुळे बनवाबनवीची शक्यताच राहत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Police patrol technology
PMRDA: डीपी रद्द, आता टीपीद्वारे कायापालट; पीएमआरडीए‌’कडून 20 ठिकाणी नगररचना योजना

संवेदनशील ठिकाणांवर लक्ष

या नव्या प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली असून, सध्या आयुक्तालय हद्दीत एकूण 1076 संवेदनशील पॉईंट्‌‍स निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक पॉईंटवर दिवसा व रात्री अशा दोन्ही पाळ्यांमध्ये नियमित गस्त होत आहे. मागील दोन महिन्यांत या ॲपवर 1 लाख 96 हजार 144 गस्त नोंदी झाल्या आहेत. प्रत्येक नोंदीसोबत फोटो आणि लोकेशनची अचूक माहिती उपलब्ध असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिअल टाइम डेटा तपासणे सोपे होत आहे.

टॅगिंगमुळे जबाबदारी निश्चित

या नव्या प्रणालीमुळे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त किती प्रभावीपणे होत आहे, हे वरिष्ठ अधिकारी थेट ॲपवर पाहू शकतात. ठराविक पॉईंटवर जर गस्त झाली नाही, तर लगेचच संबंधित पोलिसांकडून खुलासा मागवला जात आहे. यामुळे गस्तीबाबत शिस्त, पारदर्शकता येऊ लागली आहे. तसेच, भविष्यात एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर मार्शलवरील पोलिसांची जबाबदारी निश्चित करता येणार आहे.

Police patrol technology
Political News: निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस; पण वास्तवात मात्र प्रतीक्षाच

नागरिकांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. ‌‘ट्रॅफिक बडी‌’ ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‌‘ज्येष्ठानुबंध‌’ आणि त्यानंतर आता ‌‘पीसी सिटी शिल्ड‌’ ॲपद्वारे गस्तीवर वॉच सुरू आहे. या आधुनिक उपाययोजना पिंपरी- चिंचवड पोलिस दलासाठी उपयुक्त ठरणार असून, याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येणार आहेत.

नागरिकांचीही जबाबदारी

पोलिसांची गस्त आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना हे सुरक्षेचे एक अंग असले तरी नागरिकांनीही स्वतः सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो रात्री निर्जन भाग टाळावेत, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Police patrol technology
Dapodi News: दापोडीतील जलकुंभ परिसर बनतोय मद्यपींचा अड्डा; प्रशासनाचे दुर्लक्ष

गस्तीसाठी सुरू असलेल्या बारकोड प्रणालीतील त्रुटी लक्षात घेऊन आम्ही ‌‘पीसी सिटी शिल्ड‌’ ॲपच्या माध्यमातून जिओ-टॅगिंग आणि फोटो अपलोड आधारित नवी प्रणाली लागू केली आहे. यामुळे प्रत्येक गस्त पॉईंटवर पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती सुनिश्चित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ॲपवरून तत्काळ अद्ययावत माहिती उपलब्ध होत आहे.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

गस्तीच्या नोंदीचा ठोस पुरावा

यापूर्वी एखाद्या भागात गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी गस्त झाली होती, असा दावा वरिष्ठांसमोर केला जात होता; मात्र चौकशीदरम्यान तर्कविसंगती उघडकीस येत होती. नवीन प्रणालीत मात्र फोटो व लोकेशनसह ठोस पुरावा उपलब्ध होत असल्याने अशा वादांना तिलांजली मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news