महेश भागीवंत
नवलाख उंबरे- मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात नियमित लोडशेडिंग सुरू आहे. रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या घटली असून तरुण अजूनही नोकरीच्या शोधतच आहे. तालुक्यातील कान्हे-टाकवे आणि तळेगाव एमआयडीसी हे औद्योगिक क्षेत्र असूनही तरुण अजूनही चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी रांगेतच उभे आहेत. याउलट अनेक नामवंत कंपन्यांनीही मावळ तालुक्यातून पळ काढलेला दिसत आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडत असला तरी वास्तवात फक्त प्रतीक्षा दिसत आहे.
निवडणुका जवळ आल्या की इच्छुक नेत्यांचा उत्साह वाढतो. मतदारांना गोड गोड आश्वासने देऊन आणि विविध आमिषे दाखवून ते नागरिकांना मोहित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, निवडणूक संपली की नेते आपल्या मतदारांना आणि दिलेल्या आश्वासनांना विसरले असल्याचे दिसत आहे. नवलाख उंबरे परिसरातील नागरिक खऱ्या विकासापासून जनता अद्याप दूर असल्याचे दिसत आहे. (Latest Pimpri chinchwad News)
मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज
आजची जनता सुज्ञ असूनही काही तासांच्या फायद्यासाठी मताचे मोल विसरते. परिणामी, निवडणुकीनंतर पाच वर्षे पुन्हा प्रतीक्षा करण्याची वेळ येते. खऱ्या विकासासाठी आवश्यक आहे. पारदर्शक कारभार, दीर्घकालीन नियोजन, मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नागरिकही तितकेच जबाबदार
निवडणुकीपूर्वी मिळणारे काही रुपये, दारूच्या बाटल्या किंवा वस्तू यामुळे नागरिकांचे भान हरपते. या क्षणिक फायद्यासाठी ते स्वतःच्या भविष्यातील विकासाची दारे बंद करतात. त्यामुळे या सर्वांना नागरिकही तितकेच जबाबदार असल्याचे दिसत आहे. राजकारण एकेकाळी समाजकारणाचे माध्यम होते. मात्र. आता टेंडरमधील कमिशन, नातेवाईकांचा फायदा, मतदारसंघातील विकासाचे तुकडे अशा बाबींनाच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामान्य जनतेच्या मूलभूत समस्या रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या दुय्यम ठरतात.
निवडणुकीच्या वेळी नेते जनतेला डोळस ठेवतात, पण निवडून आल्यावर डोळ्यावर पट्टी बांधतात. जोपर्यंत जनता स्वतःची राजकीय जाणीव वाढवत नाही, तोपर्यंत खऱ्या विकासाची प्रतीक्षा संपणार नाही.
- लखन मराठे, सामाजिक कार्यकर्ते
आता आम्हीच जागरूक होऊन मतदान करायला हवे. नेत्यांना बदलायचं असेल तर मतदारांनी आपली दिशा बदलणे गरजेच आहे.
- ॲड. सागर शेटे, सामाजिक कार्यकर्ते