

दापोडी: गंजलेले प्रवेशद्वार, टवाळखोरांचा त्रास, गायब झालेली सुरक्षाजाळी, तुटलेले बिंब आदीमुळे संरक्षक भिंतीची पुरती दुरवस्था झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. हा परिसर टवाळखोर, मद्यपींचा अड्डा बनला आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
गणेश गार्डन येथे महापालिकेच्या वतीने अर्धा एकर जागेत पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत. या जागेला संरक्षक भिंत आहे. या संरक्षक भिंत व टाक्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे गंजले आहे. (Latest Pimpri chinchwad News)
प्रवेशद्वार आत-बाहेर करणे जिकीरीचे बनले आहे. या संरक्षक भिंतीवरील संरक्षक जाळ्या अज्ञाताने चोरून नेल्या आहेत. त्याचबरोबर तीन फूट भिंत बनवून त्यावर सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली होती. मात्र या जाळ्या गायब झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भिंत बांधताना त्या ठिकाणी काही कॉलम बिंब बनविण्यात आले होते. मात्र, हे कॉलम तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे टवाळखोरांचा उपद्रव वाढत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी टवाळखोर येऊन मनमानी प्रवेश करून मध्य प्राशन करत असल्याचा नागरिक आरोप करीत आहेत. या गोष्टीचा लहान मुलांवर परिणाम होत आहे.
पाणीपुरवठा विभाग, ह प्रभाग. जलकुंभ परिसरात राडारोडा
जलकुंभाच्या संरक्षक भिंतीशेजारी विविध प्रकारचा राडारोडा टाकण्यात आलेला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यामुळे विषारी साप वगैरे त्या ठिकाणी आढळून येत आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा राडारोडा साफ करण्याची मागणी होत आहे.
पाण्याच्या टाकीजवळ असे गैरप्रकार जर काही घडत असतील तर त्या ठिकाणची पाहणी केली जाईल. अशा अज्ञात टवाळखोरांवर कडक कारवाई केली जाईल. रात्रीच्या वेळी गस्त लावली जाईल.
- महादेव कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दापोडी.
माझी नव्यानेच बदली झालेली आहे. आल्यानंतर प्रथम या जलकुंभाच्या संरक्षण भिंतीची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच संरक्षक भिंतीचे काम व प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
- साकेत पावरा, उप अभियंता